मुंबई : ठाणे, नवी मुंबई महानगरपालिकांच्या प्रस्तावामुळेच राज्यभर मोकळ्या मैदानांमध्ये हाॅटेल्स, माॅल बांधण्यास परवानगी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगण्यातयेत आहे. सरकारच्या या निर्णयाने मुंबईतील आझाद, क्राॅस, ओव्हल मैदानांसह ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानांच्या आसपास उंच इमारती उभ्या राहू शकतात.

भारतात २०३६ साली ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्याची तयारी केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. या स्पर्धांच्या यजमानपदासाठी गुजरात, ओडिसाप्रमाणे महाराष्ट्रदेखील इच्छुक असून त्या धर्तीवर खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारकडून राज्यातील मैदानांचा विकास केला जाणार आहे. यासाठी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील, घणसोलीतील प्रस्तावीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल, पुणे येथील बालेवाडी स्टेडियम त्याचप्रमाणे ठाणे येथील दादोजी कोंडदेव मैदान यासरख्या मैदनांच्या ३० टक्के जागेच्या व्यावसायिकरणाला परवानगी देण्याचा प्रस्ताव संबंधित महापालिकांचा असून त्याअनुषंगाने नगरविकास विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाच्या सूत्राकडून देण्यात आली.

ऑलिम्पिकच्या प्रयोजनाबारोबरच राज्यात आयपीएलसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धा मुंबईतील वानखेडे, ब्रेब्रॉन या मैदानांपुरत्याच मर्यादित न राहता नवी मुंबई, पुणे, नागपूर येथील मैदानांवरही पार पडाव्यात असा सरकारचा मानस आहे. येथील मैदनांच्या परिसरात खेळाडूंच्या सरावाबरोबरच राहण्याची व्यवस्था नसल्यानेच मैदानाच्या परिरसरातच हॉटेल उपलब्ध झाल्यास त्यांच्या निवासाची व्यवस्था होऊन या ठिकाणी आयपीएल स्पर्धांचे आयोजन करता येऊ शकेल, यासाठी मैदनांतील ३० टक्के भागाचे व्यावसायिकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या माध्यमातून मैदनांच्या देखभाल-दुरुस्तीच्या मोठा खर्च पार पाडण्यासाठी उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होणार असल्याचे नगरविकास विकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नवी मुंबई, ठाणे महापालिकेचा प्रस्ताव

नवी मुंबई महापालिकेत डी. वाय. पाटील स्टेडियम आहे. त्याचबरोबर घणसोली येथे जवळपास ३ लाख चौरस मीटर क्षेत्रात (७० एकरांवर) आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभे राहत आहे. या ठिकाणी ऑलिम्पिक दर्जाच्या स्पर्धा खेळविल्या जाव्यात तसेच क्रीडा संकुलाचा दैनंदिन देखभाल खर्च भागविण्यासाठी या क्रीडासंकुलातील १/३ जागेचा वापर व्यावसायिकरणासाठी करण्याची मागणी नवी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली त्याचप्रमाणे ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानाच्या आसपास तारांकित हॉटेल उभे करण्याचाही प्रस्ताव ठाणे महापालिकेकडून नगर विकास विभागाला पाठवण्यात आला आहे. भिवंडी येथे १ लाख प्रेक्षक क्षमतेचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल ५० एकर जागेवर उभे राहत आहे. यासह राज्यातील पुणे, नांदेड, नागपूर तसेच अन्य भागातील क्रीडांगणात अशी सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने नगरविकास विभागाकडून अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.

परवानगीची जबाबदारी संबंधित प्राधिकरणांवर

मैदानातील ३० टक्के जागांचे व्यावसायीकरण करून त्या ठिकाणी खेळाडूंसाठी सुविधा तसे हॉटेल्स उभारण्याची परवानगी नगरविकास विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी स्थानिक पातळीवर देण्याची जबाबदारी ही संबंधित महापालिका तसेच सिडको यांसारख्या प्राधिकरणांकडे राहणार असून याबाबतचा निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.