मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत बांधण्यात आलेल्या ३४ उड्डाणपूल देखभालीसाठी महानगरपालिकांकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. सात दिवसांत ते ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित महानगरपालिकांना दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील ३४ उड्डाणपुलांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित महापालिकांकडे असेल.
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर)वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसीने ११९६ मध्ये ५५ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ३४ उड्डाणपूल बांधले. यात मुंबईतील २७ उड्डाणपुलांचा समावेश आहे. या उड्डाणपुलाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी सध्या एमएसआरडीसी वा संबंधित पथकर वसुली करणाऱ्या कंत्राटदारावर आहे.
पावसाळ्यात उड्डाणपुलावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर होतो. मुंबईत रस्त्यांवर आणि उड्डाणपुलावर खड्डे दिसतात. यावरुन विविध सरकारी यंत्रणांमध्ये वादही होतो. मुंबईत यावरून महानगरपालिकेला टीकेला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर आता महामुंबईत एमएसआरडीसीने बांधलेले ३४ उड्डाणपूल पालिकांकडे देखभालीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.
एमएमआरमधील उड्डाणपूल, रस्ते पालिकांकडे देखभालीसाठी देण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार आता अंतिम निर्णय झाला आहे.
३४ उड्डाणपुलांची जबाबदारी मुंबईतील एमएसआरडीसीचे २७ उड्डाणपूल मुंबई पालिकेकडे, ठाण्यातील ३ उड्डाणपूल तेथील महानगरपालिकेकडे तर नवी मुंबईतील ४ उड्डाणपूल नवी मुंबई महानगरपालिकेकडे देखभालीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सात दिवसांत आहे त्या स्थितीत संबंधित पालिकांनी उड्डाणपूल देखभालीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश आहेत. याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर दुजोरा दिला आहे. तर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही एमएसआरडीसीचे उड्डाणपूल देखभालीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगितले.
