मुंबई : राज्य सरकारकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर आदींपोटी मुंबई महानगरपालिकेला तब्बल १०,९४८.५८ कोटी रुपये येणे आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडील तब्बल ७२४१.४४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत भाजप – शिवसेना (शिंदे) महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून महापालिकेला थकबाकीची रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारच्या विविध विभागांकडून मालमत्ता कर, तसेच विविध विभागांच्या कार्यालयांकडून सहाय्यक अनुदान येणे आहे. तसेच राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी सहाय्यक अनुदान दिले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून

राज्य सरकारकडून प्राथमिक आणि शिक्षणाच्या खर्चापोटी देण्यात येणारे अनुदान महापालिकेच्या तिजोरीत जमाच झालेले नाही. आजघडीला सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर आदींपोटी तब्बल १०,९४८.५८ कोटी रुपयांची राज्य सरकारकडे थकबाकी आहे. दरम्यान, त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या खर्चासाठी मिळणारे ५६५५.३० कोटी रुपये आणि माध्यमिक शिक्षणासाठी दिले जाणारे १५८६.०८ कोटी रुपये असे एकूण ७२४१.४४ कोटी रुपयांचा समावेश आहे. ही रक्कम मिळावी यासाठी महापालिकेकडून राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र महापालिकेला थकीत रक्कम मिळविण्यात अद्यापही यश आलेले नाही. राज्यात भाजप – शिवसेना (शिंदे) महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात थकबाकीची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य सरकारकडून आगामी वर्षात प्रथमिक शिक्षणासाठी ६४३.८० कोटी रुपये, तर माध्यमिक शिक्षणासाठी २४६.०८ कोटी रुपये अनुदान प्रस्तावित आहे. राज्य सरकारकडून ही रक्कम वेळेत मिळू शकली नाही, तर थकबाकीच्या रकमेत आणखी ८८९.८८ कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.