मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता आता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला असून तो १ जानेवारी २०२६पासून पूर्वलक्षी स्वरुपात लागू करण्यात आला आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीतील महागाई भत्ता वाढीची थकबाकीही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार दिनांक १ जानेवारी, २०२६ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ५८ टक्क्यांवरुन ६० टक्के करण्यात यावे.
सदर महागाई भत्तावाढ ७ महिन्यांच्या (जानेवारी, २०२६ ते जुलै, २०२६ या कालावधीतील) थकबाकीसह ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावे, असा आदेश सरकारने दिला आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहणार आहे. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च करण्यात येणार आहे.
