मुंबई : अराजपत्रित सरकारी कर्मचाऱ्यांना सणांच्या तोंडावर दिल्या जाणाऱ्या आगाऊ रकमेत (अग्रिम) साडेसात हजारांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी सणांसाठी १२ हजार ५०० रुपये इतकी उचल दिली जात होती. त्यात आता ७ हजार ५०० रुपयांची वाढ करून तो २० हजार रुपये करण्यात आला आहे.
१ जानेवारी २००६ पासून सुधारित वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४ हजार ८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना आता २० हजार रुपये सण अग्रिम घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, सणांमध्ये दिवाळीबरोबरच रमजान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवत्सरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती), स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीही अग्रिम देय असेल.
सण अग्रिम मंजूर करणे आणि त्याची वसुली करण्यासंदर्भातील पूर्वीच्या अटी व शर्ती कायम ठेवण्यात आल्या आहेत. सरकारी आदेश आल्याच्या दिनांकापासून या आदेशांची अंमलबजावणी होणार आहे. तसेच मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये यथावकाश आवश्यक सुधारणा करण्यात येणार असल्याचे वित्त विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य सरकारी महासंघाने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र वित्त विभागाने २० हजार रुपये सण अग्रिम करण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता दहा सणांसाठी आवश्यकतेनुसार अग्रिम घेणे सरकारी कर्मचाऱ्यांना शक्य हाेणार आहे.
