मुंबई : राज्यात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. याविषयीचे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र महासंघाशी संलग्न विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याची इच्छा शासनाला कळविली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीत अधिक रक्कम उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्यातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवा (भा.प्र.से.), भारतीय पोलीस सेवा (भा.पो.से.), भारतीय वन सेवा (भा.व.से.) तसेच राज्य शासनाच्या अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही या मदतकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातून एक दिवसाच्या वेतनाची कपात करताना मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या एकत्रित रकमेच्या आधारे गणना करण्यात येणार आहे. वेतन देयक तयार करताना नियमित वजावटीनंतर एक दिवसाच्या वेतनाची रक्कम वजा करून उर्वरित वेतन संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. बँक खात्यात थेट वेतन जमा होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही ही कपात करून उर्वरित रक्कम खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे, मंडळे आणि स्वायत्त संस्थांच्या विभागप्रमुखांनी या परिपत्रकाची माहिती अधिकारी-कर्मचाऱ्यांना द्यावी. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचे महत्त्व समजावून सांगून त्यांना योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वेतनातून जमा होणाऱ्या रकमेची कर्मचारीनिहाय नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदवही तयार करण्याचेही निर्देश आहेत. संबंधित कार्यालयांनी जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत भरून त्याची पोचपावती आणि देणगीदारांची यादी नियमानुसार सादर करायची आहे.
कपातीस हरकत असल्यास दोन दिवसांत पत्र
परिपत्रकात वेतनकपातीबाबत हरकत नोंदविण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास हरकत असेल, त्यांनी परिपत्रकासोबत दिलेल्या नमुन्यातील हरकतपत्र संबंधित कार्यालयाच्या नियंत्रक किंवा आस्थापना अधिकाऱ्यामार्फत आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे दोन दिवसांत सादर करावे, असे नमूद करण्यात आले आहे.
आयकर सवलत मिळणार
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या देणगीवर आयकर कायद्याच्या कलम ८०जी अंतर्गत सवलत मिळण्याचा परिपत्रकात उल्लेख आहे. त्यासाठी देणगीदारांची आवश्यक माहिती संकलित करून २५ नोव्हेंबर पूर्वी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे सादर करण्याच्या सूचना प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या आहेत.
