स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करून किरकोळीत विकल्या जाणाऱ्या भाजीच्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या राज्य सरकारपुढे आता कांदा टंचाईचे संकट येऊ घातले आहे. दुष्काळामुळे यंदा उन्हाळी कांद्याचे पीक घटले आहे. त्यामुळे मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना होणारी कांद्याची आवक सोमवारपासून निम्म्यावर आली आहे. यामुळे वाशीतील घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा किलोमागे थेट २२ ते २५ रुपयांनी विकला जाऊ लागताच किरकोळ बाजारात याच कांद्याने ३५ रुपयांपर्यंत उडी घेतल्याचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे, येत्या महिनाभर तरी या परिस्थीतीत फारसा बदल होण्याची शक्यता कमी असून महागाईच्या हंगामात कांद्याचे चढे दर सर्वसामान्यांना त्रासदायक ठरण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
दुष्काळामुळे यंदा कांद्याचे पीक मोठय़ा प्रमाणावर कमी झाल्याची ओरड गेल्या काही दिवसांपासून सतत होत आहे. नाशिक जिल्ह्य़ात एप्रिल तसेच मे महिन्याच्या मध्यावर निघणारे उन्हाळी कांद्याचे पीक यावेळी घटल्यामुळे गेल्या आठवडाभरापासून मुंबई तसेच आसपासच्या परिसराला होणारी कांद्याची आवक कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा १८ ते २२ रुपयांनी विकला जात आहे. घाऊक बाजारात दर चढू लागल्याने किरकोळीचा कांदाही किलोमागे ३० रुपयांनी विकला जात होता. एरवी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) घाऊक बाजारात कांद्याची मोठी आवक असते. सोमवारी मात्र जेमतेम ६० गाडी कांद्याची आवक या बाजारात झाली, अशी माहिती एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. मुंबई परिसरातील दर आटोक्यात रहाण्यासाठी दररोज १०० गाडी कांद्याची आवक आवश्यक असते.
यापकी ६० गाडी कांदा हा येथील हॉटेल व्यावसायिकांना लागतो. असे असताना घाऊक बाजारातील कांद्याची आवक निम्म्यावर येताच घाऊक बाजारात दर थेट २५ रुपयांपर्यत पोहचल्याचे वाळुंज यांनी सागितले.
दरम्यान, अगदी काल-परवापर्यंत किरकोळ बाजारात ३० रुपयांनी विकला जाणारा कांदा सोमवारी सायंकाळी मुंबई, ठाण्यातील काही बाजारांमध्ये ३२ ते ३५ रुपयांनी विकला जात असल्याचे चित्र दिसत होते. कांद्याचे नवे पीक साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात येत असते. तोवर उन्हाळी कांद्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.
मात्र, उन्हाळी कांद्याचे पीक कमी असल्यामुळे आणखी दरवाढ होण्याची भीती काही कांदा व्यापारी व्यक्त करू लागले आहेत.  

हंगामातील सर्वाधिक दर
देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी लिलाव सुरू होताच कांद्याची किमान १५०० ते २३६१ रुपये प्रतिक्विंटल विक्री झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक दर आहे. दोन दिवसांत कांद्याला ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. आवक कमी झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात आले.