मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या पावसाळ्यानंतरच्या वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत (६ तास) बंद ठेवण्यात येणार आहेत. यावेळी हवाई वाहतूक बंद असणार आहे. जगातील सर्वात व्यस्त एकल – धावपट्टी विमानतळांपैकी एक म्हणून मुंबई विमानतळाची ओळख आहे. धावपट्टीची अखंडता आणि आंतरराष्ट्रीय विमानचालन सुरक्षा मानकांचे सतत पालन सुनिश्चित करण्यासाठी, दरवर्षी मान्सूननंतर सविस्तर देखभाल केली जाते. या देखभालीमध्ये पृष्ठभागाची दुरुस्ती, दिव्यांची तपासणी, धावपट्टीवरील खुणा आणि जलनिःसारण तपासणी यांचा समावेश असतो. या सर्व बाबी सर्वोत्तम परिचालन परिस्थिती राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
विमानाच्या देखभाल – दुरुस्तीसाठी विमान कंपन्या आणि वैमानिकांसाठी सूचना खूप आधीच जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे विमान कंपन्या, ग्राउंड हँडलर्स आणि इतर संबंधितांना उड्डाणांचे वेळापत्रक आणि मनुष्यबळ नियोजनात बदल करता येईल. विमानतळ चालकाने नियोजित कामाच्या सहा महिने आधीच सर्व संबंधित संस्थांशी समन्वय साधला आहे. ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत नाही. मुंबई विमानतळावर दिवसाला सुमारे ९५० ते एक हजार विमानांची ये-जा होते. दीड ते पावणे दोन लाख प्रवासी प्रवास करतात.
