मुंबई : कुणी घर देता का घर…? कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ नाटकातील मध्यवर्ती पात्र म्हणजेच गणपतराव ‘अप्पासाहेब’ बेलवलकर यांची ही आर्त हाक मराठी रंगभूमीवर प्रेम करणार्‍यांना परिचित नसेल असा रसिक विरळाच. मात्र आता सरकारी खर्चाने ‘नटसम्राट’ गुजराती रंगभूमीवर येत आहे. यात नाटकाचे नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, कलाकारांचे मानधन, प्रयोगासाठी होणारा वाहतुकीचा खर्च उचलण्यात येणार आहे.

विविध भागांत नाटकाचे १० प्रयोग तरी व्हावेत याकरिता राज्य सरकारने पुढाकार घेतला असून त्यासाठी २५ लाख ६० हजार रुपयांची तरतूद केली. राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या गुजराती भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या गुजराती साहित्य अकादमीमार्फत हे नाटक रंगभूमीवर येणार असून त्याचे दिग्दर्शन प्रितेश सोडा यांनी केले आहे. नाटकाचा पहिला प्रयोग २२ ऑगस्टला प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत निवडक १८० रसिकांच्या उपस्थितीत होईल.

रक्ताच्याच माणसांनी पाठ फिरवल्यामुळे एका महान रंगभूमी कलावंताची कशी पडझड होते, याची हृदयद्रावक कहाणी म्हणजे नटसम्राट. दीर्घकाळ रंगमंचावर अप्पासाहेबांची भूमिका साकारणार्‍या डॉ. श्रीराम लागू यांनी या नाटकाला अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवले. त्यानंतर सतीश दुभाषी, उपेंद्र दाते, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, राजा गोसावी यांनी ही भूमिका साकारली. काही वर्षांपूर्वी आलेल्या नाना पाटेकर यांच्या नटसम्राट या चित्रपटालाही रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता.

अकादमीचा पहिलाच प्रयोग

नाटकाचे हक्क पॉप्युलर प्रकाशनाकडे होते. त्यांच्याकडून मान्यता घेऊन या नाटकाचे भाषांतर गुजरातीत करण्यात आले आहे. अकादमीच्या वतीने एखादे मराठी नाटक गुजराती रंगभूमीवर आणण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे, अशी माहिती अकादमीचे सहसचिव सचिन निंबाळकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.