मुंबई: आर्थिक वर्षाच्या अखेरीस निधी खर्ची दाखविण्यासाठी मंत्रालयात सोमवारी अनेक विभागांची धावपळ सुरु होती. खात्याला मिळालेल्या निधी व्यपगत होऊन परत जाऊ नये यासाठी विविध योजना आणि प्रकल्पांवर निधी खर्ची दाखविण्यासाठी गेल्या दोन दिवसांत तब्बल ५०० हून अधिक शासन निर्णय(जीआर) निर्गमित करण्यात आले आहेत.
आर्थिक वर्ष संपत असताना विभागाला मिळालेला निधी खर्च करण्यासाठी मंत्रालयातील सर्वच विभागात गेल्या दोन दिवसांपासून धावपळ सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण लक्षात घेऊन वित्त विभागाने यंदा सर्वच विभागांच्या खर्चावर काहीप्रमाणात निर्बंध आणले होते. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत अनेक विभागाना मिळालेला निधी खर्च करता आलेला नव्हता.
मंगळवारी ३१ मार्च असला तरी महावीर जयंतीची सुट्टी असल्याने आजच आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याचे मंत्रालयात लगबग सुरू होती. निधी ३१ मार्चच्या आत खर्च झाला नाही तर तो व्यपगत होईल या धास्तीने ग्रामविकास, पर्यटन, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक न्याय आदी विभागांमध्ये धावपळ सुरु असून गेल्या दोन दिवसात सातत्याने निधी खर्चाबाबतचे शासन निर्णय काढले जात आहेत. आज दिवसभरात अशाचप्रकारे निधी तरतूद किंवा खर्चाचे तब्बल ३७० शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून यात प्रामुख्याने सहकार, सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, उच्च आणि तंत्रशिक्षण, पर्यटन, नगरविकास आदी विभाग आघाडीवर होते.
