दुष्काळी परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या रक्कमेत वाढ तसेच काही निकषांमध्ये बदल करण्यात आल्याची घोषणा महसूल व कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. वीज कोसळून, झाडावरून पडून किंवा अपघातात मृत्यमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दीड लाखांऐवजी आता चार लाखांची मदत देण्यात येईल.
खरीप आणि रब्बी हंगामात दुष्काळी परिस्थिती जाहीर करावी लागली आहे. टंचाईवर मात करण्याकरिता पैसे कमी पडू दिले जाणार नाहीत, अशी ग्वाही खडसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी व तहसीलदारांना जादा अधिकार दिल्याचेही त्यांनी जाहीर केले. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देताना सध्या पोलीस आणि महसूल विभागाकडून छाननी झाल्यावर मदत मिळते. अहवाल तयार करण्यात अनेकदा विलंब लागतो. म्हणूनच यापुढे सरकारी यंत्रणांकडून छाननी अहवाल येण्यापूर्वी लगेचच मदत दिली जाईल, असे एकनाथ खडसे यांनी यावेळी जाहीर केले.
सध्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम दोन लाख करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, भास्कर जाधव आदी सदस्यांनी केली होती.
पण एकनाथ खडसे यांनी या मदतीच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी मान्य केली नाही.

मदतीचे अन्य निर्णय
* शेतीपंप बंद असलेल्या काळातील सध्याच्या ३३.५० टक्क्यांऐवजी १०० टक्के वीजबिल माफ
* नैसर्गिक आपत्तीत गाई, म्हशींचा मृत्यू झाल्यास मालकांना ३० हजार मदत
* गाढव, उंट किंवा अन्य गाडय़ा ओढणाऱ्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास १५ हजार मदत
* कोंबडी मृत झाल्यास ३७ रुपये मदत
* फळबागांचे नुकसान झाल्यास हेक्टरी १८ हजारांची मदत
* धानाला प्रति क्विंटल २०० रुपये मदत