मुंबई: राज्य सरकारी आणि बंध पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केली. होळी सणाच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून ही भेट देण्यात आली असून या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.

वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली. राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे. आर्थिक सुरक्षितता राखताना कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. यामुळे कर्मचारी अधिक उत्साहाने काम करतील आणि राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास सरकारला असल्याचे वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सुमारे ५ लाख ९६ हजार शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे जयस्वाल म्हणाले. याविषयीचा शासननिर्णयही जारी करण्यात आला आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता समान पातळीवर आला आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही खुशखबर मिळालेली असताना दुसरीकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीही आठव्या वेतन आयोगाचे काम चालू झाले आहे. लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.