मुंबई : इंडियन स्किल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.
एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कौशल्य मंत्री लोढा यांच्या हस्ते कौशल्य विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी लोढा यांनी राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्याचबरोबर
राज्यातील उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि ‘कौशल्याचार्य’ या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिल्पनिदेशकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये २०२३-२४ साठी राज्यस्तरीय व विभागस्तरीय ९ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राज्यस्तरीय संस्था २०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातून राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार जालनामधील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती विभागातून राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार यवतमाळमधील हुतात्मा मधुकर चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तृतीय पुरस्कार एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना देण्यात आले. राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेतील २२ विजेत्यांचा व डिपेक्स स्पर्धेतील १३ विजेत्यांचा आणि वंदे मातरम लोगो स्पर्धेतील रवी मोतीराम पवार, ओमकार कोळेकर, किरण कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला.
तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत
आगामी काळात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सोय करण्यात येणार आहे. सरकार केवळ कर्ज देऊन थांबणार नाही, तर प्रशिक्षणापासून ते मेंटरशिप, मार्केटिंगपर्यंत सर्व टप्प्यांवर तरुणांच्या पाठीशी उभे राहील. आज महाराष्ट्र जीडीपी, परकीय गुंतवणूक, निर्यात, स्टार्टअप्स आणि इनोव्हेशनमध्ये देशात प्रथम क्रमांकावर आहे. मेहनत आणि कौशल्याची हीच खरी ओळख असून, युवा शक्तीच्या जोरावर आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू, असे लोढा यावेळी म्हणाले.
‘सेंटर ऑफ एक्सेलेंस’ आणि नव्या तंत्रज्ञानावर भर
राज्यातील ११०० हून अधिक सरकारी आणि खाजगी ‘आयटीआय’मध्ये उत्कृष्ट शिक्षण, उत्तम अभ्यासक्रम आणि उद्योगांशी अलाईनमेंट करत आहोत. विभागीय स्तरावर आपण ‘सेंटर ऑफ एक्सेलेंस’ उभारण्याची तयारी करत आहोत. ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान ५४ हजार विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म ट्रेनिंग मॉड्यूल्सचा लाभ दिला आहे. पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आता आयटीआयच्या मूल्यांकनाची नवी पद्धत विकसित केल्याचे अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी सांगितले.
तरुणांच्या कौशल्याला मिळणार नवी दिशा
मोबाइल विधायक कामासाठी आणि कौशल्य वृद्धीसाठी कसा वापरता येईल, यादृष्टीने ‘रील टू रियल टाइम’ ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरेल. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना उद्योजक बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आयटीआयमध्ये ‘लर्निंग विथ अर्निंग’ ही योजना राबवण्यावर भर दिला जात आहे. दक्षिण कोरियाच्या धर्तीवर ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासोबतच प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि उत्पन्न मिळवून देण्याचा मानस असल्याचे कौशल्य विकास आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी सांगितले.
