मुंबई : शाळा सुरू करताना गर्दी होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्याची सूचना शिक्षण विभागाने शाळांना केली आहे. यानुसार मुलांना टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये बोलिवण्यात यावे तसेच शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करू नये, अशी खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यात येत्या बुधवारपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षां गायकवाड यांनी केले आहे. 

शिक्षण खात्याने परिपत्रक सोमवारी जारी केले आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे करोना लसीकरण (दोन्ही लसी) बंधनकारक असून त्यांनाच शाळा व कार्यालयामध्ये प्रवेश देण्यात यावा. विद्यार्थ्यांचे नाक व तोंड मुखपट्टीने पूर्णत: झाकलेले असले पाहिजे, याबाबत विद्यार्थ्यांना सातत्याने सांगावे.

शाळेतील परिपाठ, स्नेह संमेलन व इतर गर्दीचे कार्यक्रम अथवा एकमेकांशी संपर्क होईल, अशा कार्यक्रमांच्या आयोजनावर कडक निर्बंध असतील. शिक्षक-पालक बैठका देखील शक्यतो ऑनलाइन घ्याव्यात. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठकव्यवस्था असावी. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी त्या गावातील करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.पालकांना शाळांच्या आवारात परवानगी देण्यात येऊ नये. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत. शाळेतील एखादा विद्यार्थी करोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिक्षकांची गावांमध्येच शक्यतो मुक्कामाची व्यवस्था करावी. शिक्षकांकडून शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर  होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. १ तारखेला शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी स्वागत करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याची सूचना करण्यात आली आहे.