नव्या कायद्याचा मसुदा : शोषण करणाऱ्यांना तीन वर्षे शिक्षा, १० लाखांचा दंड, सीसीटीव्ही बंधनकारक
डान्सबार बंदीबाबतचा नवा कायदा अधिक कडक करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यानुसार चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या या विधेयकाचा मसुदा मंगळवारी विधिमंडळाच्या संयुकत समितीस सादर करण्यात आला असून, त्यावर समितीचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. नव्या कायद्यात शाळा आणि धार्मिक स्थळापासून एक किलो मीटरच्या परिसरात डान्सबारना परवानगी मिळणार नसून बारच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बारबालांना स्पर्श करणाऱ्यांना सहा महिने तर बारबालांच्या शोषणास जबाबदार असणाऱ्यांना तीन वर्षे शिक्षा आणि १० लाखाचा दंड अशी तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतरही जनमताचा रेटा आणि सरकारवर उडालेली टीकेची झोड यामुळे डान्सबार बंदीसाठी नव्याने कायदा याच अधिवेशनात करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. तसेच नव्या कायद्यात त्रुटी राहू नयेत यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. मंगळवारी या समितीसमोर गृह विभागाने तयार केलेल्या नव्या कायद्याचा मसुदा मांडण्यात आला. पूर्वी मुंबई पोलीस कायद्यात सुधारणा करून डान्सबारवर बंदी घालण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठविल्यानंतर सरकारने नव्याने २६ अटी घालून बारना परवानगी देण्याची तयारी दर्शविली, मात्र त्यातील जाचक अटी रद्द करून डान्सबारना परवाने देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर नवा कायदा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार या कायद्याचे विधेयक तयार करण्यात आले. त्यात पूर्वीपेक्षा अधिक कडक तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शाळा आणि धार्मिक स्थळापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत डान्सबारना परवानगी न देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पूर्वी हे अंतर १०० मीटपर्यंतचे होते. त्यामुळे बारना परवानगी मिळविणे बारमालकांना अवघड ठरणार आहे. या विधेयकातील तरतुदीबाबत चर्चा करून समिती आपले मत देणार असली तरी आजच्या बैठकीत तत्त्वत: सहमती दर्शविण्यात आल्याचे कळते.

अन्य महत्त्वाच्या तरतुदी
* डान्सबारमध्ये प्रवेशासाठी ग्राहकांना ओळखपत्र सक्तीचे.
* डान्सबारमध्ये तसेच बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक.
* निवासी क्षेत्रात डान्सबारला परवानगी नाही.
* डान्सबार सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवावेत.
* प्रत्येक बारमध्ये तीन महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची सक्ती
* बारच्या ठिकाणी पाळणाघराची सुविधा द्यावी लागणार
* १० बाय १२ फूट आकाराचा रंगमंच. त्यावर सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा बांधावा लागेल
* स्टेज आणि ग्राहकांमध्ये पाच फुटांचे अंतर असेल
* ग्राहकांना बारबालांवर दौलतजादा करण्यास मनाई
* बारबालांना स्पर्श केल्यास सहा महिन्यांची शिक्षा