मुंबई: राज्यमंत्री आणि प्रशासकीय कार्यालयांसाठी मंत्रालयाची नवीन इमारत त्याच आवारात उभी राहत आहे. या वास्तूला वारसा नियमांचा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे सात मजल्यांची प्रस्तावित असलेली ही इमारत आता चारच मजल्यांची होणार असून १ मे रोजी महाराष्ट्रदिनी या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

मंत्रालयातील अपुऱ्या दालन व्यवस्थेमुळे राज्यमंत्र्यांची कार्यालये विधानभवनात हलवावी लागत होती. यामुळे सरकारला राज्यमंत्र्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागत होती. यावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाच्या बागेच्या जागेवर नवीन इमारत उभारणीच्या कामाला परवानगी दिली. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या १०० दिवसांच्या ध्येयपूर्तीत या इमारतीचा समावेश करण्यात आला. त्यासाठी इमारत बांधकामाचा कार्यारंभ आदेश १ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आला.

मात्र, प्रत्यक्ष सुरु करताना अनेक अडचणी आल्याने १०० दिवसात हे काम पूर्ण होऊ शकले नाही. पोलादाच्या बांधणीने उभारण्यात येणारी ही पहिलीच सरकारी इमारत आहे. सुरुवातीला या इमारतीचे सात मजली बांधकाम होणार होते. मात्र पुरातन वारसा नियमांनुसार या विभागात केवळ २४ मीटरपर्यंत उंचीच्या इमारती उभारणे बंधनकारक असल्याची सूचना हेरिटेज समितीकडून करण्यात आली. त्यामुळे या इमारतीचे काम पाच मजल्यांचे करण्याचे ठरले.

मंत्रालयच्या दृश्यसौंदर्याला बाधा, चारच मजल्यांची इमारत

ही इमारत आकर्षक आणि पूर्णत: काचेच्या भिंतींची बांधण्यात येत असली तरी पाच मजल्यापर्यंत ही इमारत बांधल्यास मंत्रालयाच्या पाचव्या-सहाव्या मजल्यावरून दिसणाऱ्या दृश्य सौंदर्याला बाधा निर्माण होणार होता. त्यामुळे आधी सात मजल्याची ठरलेली ही इमारत पाच मजल्यांपर्यंत आणि दृश्यसौंदर्याल बाधा निर्माण होऊ नये म्हणून आणखी एक मजला कमी करून चारच मंजल्यांची बांधण्यात येणार आहे.

इमारतीतील कार्यालये कोणासाठी?

ही इमारत प्रामुख्याने राज्यमंत्र्यांसाठी बांधण्यात येणार होती. राज्यमंत्र्यांची २० दालने या इमारतीत करण्याचे प्रयोजन आहे. मात्र या सरकारमध्ये केवळ सहा राज्यमंत्री आहेत. त्यामुळे या सहा मंत्र्यांची दालने या इमारतीत हलवली जातील. त्याचप्रमाणे महात्मा फुले मंडईलगतच्या इमारतीतील आरोग्य विभागाचे कार्यालय तसेच नरिमन पॉइंट परिसरात भाड्यावर असलेली सरकारी कार्यालये या इमारतीत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या इमारतीच्या बाहेरील भिंती काचेच्या उभारण्यात येणार आहेत.