मुंबई: राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत असतानाच ही संख्या वाढविण्यासाठी सरकारने नवीन धोरण हाती घेतले असून त्यातून येत्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या २५ टक्यांनी वाढेल, असा दावा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला.

विक्रम पाचपुते, प्रविण दटके, अमित देशमुख आदी सदस्यांनी मराठी माध्यमांच्या शाळामधील घटत्या पटसंख्येबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान भुसे यांनी पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने त्यांचे शहरी भागात होणाऱ्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी संख्येत घट होत असल्याची कबुली दिली.

मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या सातत्याने कमी होत असल्याने मागील १५ वर्षा कालावधीत राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २२ हजार शाळांतील तब्बल ७२ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे घटल्याचा आरोप सदस्यांनी केला.

यावर बोलताना, राज्यामध्ये प्राथमिक स्तरावर खाजगी व्यवस्थापनाच्या ६ हजार ९६३ शाळा असून त्यामध्ये आधार विद्यार्थीसंख्येच्या आधारावर एकूण ४९ हजार ५४३ शिक्षकांची पदे मंजूर झाली आहेत. तसेच माध्यमिक स्तरावर व्यवस्थापनाच्या १७ हजार २६३ शाळा असून त्यामध्ये आधार प्रमाणित विद्यार्थीसंख्येच्या आधारावर १लाख ९२ हजार ५८४ शिक्षक पदे मंजूर झाली आहेत. सन २०१२-१३मध्ये राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या २ कोटी १८ लाख होती त्यात घट होऊन आता २ कोटी १२ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आल्यानंतर सहा लाख विद्यार्थी कमी आढळून आल्याचेही भुसे यांनी सांगितले.

शाळांमधील गळती कमी करण्यासाठी सातारा आणि सांगली येथील ५४० शाळांचे मॉडेल शाळांमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढ होण्यासाठी दृष्टीने ४७७ आदर्श शाळा व ८२७ पीएमश्री शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच मराठी शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, पायमोजे, बुट यासोबतच निपुण महाराष्ट्र, समग्र शिक्षा अभियान अशा विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात असून येत्या शैक्षणिक वर्षात किमान २५ टक्के विद्यार्थी संख्या वाढेल असा दावाही भुसे यांनी केला.