मुंबई : राज्यातील करोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी दुसरी लाट पूर्णपणे ओसरलेली नसल्याने गर्दी करू नका आणि मुखपट्टी वापरा. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना अधिक सावध राहिले पाहिजे. जगात इतरत्र करोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग  वाढत असून आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे महत्त्वाचे आहे याचा पुनरुच्चार करत दररोज १५ लाख लसीकरणाची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

एमएमआरडीएने मालाड येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उभारलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचे हस्तांतरण मुंबई महानगरपालिकेला करण्यात आले.

आपण आरोग्य सुविधांच्या उभारणीत आणि नागरिकांच्या आरोग्याचे हित जोपासताना कोणतीही उणीव भासू देणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दररोज १५ लाख लशी देण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले. प्रारंभी महानगर आयुक्त श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले.

* तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या कोविड सेंटर्समधील रुग्णशय्यांची संख्या वाढवण्यासोबतच चार नवीन कोविड केंद्रे सुरू करणार.

* त्यापैकीच एक म्हणजे मालाड जम्बो कोविड केंद्र होय. यात २१७० रुग्णशय्या आहेत. त्यात जवळपास ७० टक्के म्हणजे १,५३६ प्राणवायू रुग्णशय्या तर १९० आयसीयू रुग्णशय्या आहेत. लहान मुलांसाठी २०० प्राणवायू रुग्णशय्या आणि ५० आयसीयू रुग्णशय्या आहेत.