ग्राहकांच्या मते मात्र धूळफेक

खाद्यपदार्थाचे अवाच्या सवा वाढविलेले भाव कमी झाल्याचे फलक मुंबईतील काही मल्टिप्लेक्समध्ये बुधवारपासून झळकू लागले असले तरी ती ग्राहकांची धूळफेक ठरते आहे. अनेक मल्टिप्लेक्सवाल्यांनी कमी केलेली किंमत क्षुल्लक आहे. तर काहींनी आठवडय़ाचे काही दिवसच खाद्यपदार्थाच्या किमती कमी ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाच्या भरमसाट किमतींची झळ प्रेक्षकांना झळ बसत होती. त्यातच राज्य सरकारने बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यावर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आणि बंदी घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावरून मल्टिप्लेक्समध्ये आंदोलन करत खाद्यपदार्थाच्या किमती कमी करण्यासाठी दडपणही आणले. सर्व बाजूंनी कोंडी झाल्यावर मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाच्या किमती १ ऑगस्टपासून कमी करणार असल्याचे मल्टिप्लेक्स असोसिएशनने सांगितले होते. त्याप्रमाणे काहींनी किमती कमी केल्या आहेत. मात्र ती फारच क्षुल्लक आहे. काहींनी पॉपकॉर्नच्या किमती २४० रुपयांवरून केवळ २००वर आणल्या आहेत. त्यामुळे ही ग्राहकांची धूळफेक ठरते आहे. तसेच अजूनही बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास काही मल्टिप्लेक्समध्ये बंदी असल्याचे दिसून येत आहे.काही ठिकाणी आठवडय़ाच्या सात दिवसांपैकी केवळ सोमवार ते शुक्रवार (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) असे पाच दिवसांपुरतेच दर कमी केले आहेत. इतर वेळेस (सुट्टीच्या दिवशी) प्रेक्षकांची संख्या जेव्हा जास्त असते तेव्हा हे दर चढेच असतील.  ही ग्राहकांची फसवणूक असल्याची प्रतिक्रिया  व्यक्त  होत आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष दीपक अशर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. दरम्यान आयनॉक्स रघुलीला, कांदिवली पश्चिममधील सिनेमॅक्स, पीव्हीआर मिलाप यांनी आपल्या खाद्यपदार्थाचे भाव कमी केल्याचे दिसून येत आहे. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाच्या भावाबाबत जयनेंद्र बक्षी यांनी  याचिका  केली होती.

  • मुंबई ग्राहक पंचायतीच्या उपाध्यक्ष ज्योती मोडक यांनी १ ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थाचे भाव कमी झाले असल्याचे सांगितले. मात्र हे भाव खूप कमी प्रमाणात कमी करण्यात आले आहेत.