मुंबई : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करून खळबळ उडवून देणारे आणि कालांतराने खंडणी आणि दलित अत्याचारविरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर पाच महिने बेकायदा सेवेत गैरहजर असलेले गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांना अखेर गुरुवारी निलंबित करण्यात आले. याच प्रकरणात त्यांना साथ दिल्याचा आरोप असलेले उत्पादन शुल्क विभागाचे नागपूरचे अप्पर अधीक्षक पराग मणेरे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.

अँटालिया स्फोटके व मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वादग्रस्त पोलीस निरीक्षक सचिन वाझे याच्या अटकेनंतर सरकारने परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करीत गृहरक्षक दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर नाराज झालेल्या सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. सिंह यांच्या आरोपानंतर देशमुख यांच्यामागे केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाचा ससेमिरा लागला. परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई व ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते.

परमबीर यांच्याविरोधात मुंबईच्या मरिन ड्राइव्ह पोलीस ठाणे, ठाणे नगर तसेच कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचे तसेच कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर यांच्याविरोधातील गुन्हय़ांचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष पथक गठित केले होते. 

गंभीर स्वरूपाचे दाखल असलेले गुन्हे आणि ५ मेपासून सेवेत गैरहजर राहिल्याने बेशिस्त वर्तवणूक आणि प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून गृह विभागाने सिंह यांना सेवेतून निलंबित केले आहे. तर खंडणी आणि अ‍ॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झालेले तत्कालीन पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

खंडणीच्या गुन्ह्यात चौकशीचा ससेमिरा मागे लागताच सिंह वैद्यकीय कारण देत ५ मेपासून रजेवर गेले ते अजूनही कामावर हजर झालेले नाहीत. चौकशीला हजर न झाल्याने मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी परमबीर सिंह यांना १७ नोव्हेंबरला फरारी घोषित केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सिंह मुंबईत दाखल झाले आणि चौकशीला सामोरे गेले होते. सेवेत दाखल न होताही मुंबईत पोलीस चौकशीसाठी हजर होताना सिंह यांनी महासंचालक म्हणून त्यांना मिळालेले अधिकृत सरकारी वाहन वापरल्याबद्दल गृह विभागाने चौकशी सुरू केली होती.

फरारी आरोपी असल्याचा आदेश रद्द

मुंबई : गोरेगाव येथील खंडणी प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरारी गुन्हेगार म्हणून घोषित करण्याचा आदेश रद्द करण्याचा आदेश मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी रद्द केला. त्याच वेळी अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यासाठी मात्र स्वतंत्र अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने या वेळी परमबीर यांना दिली.