मुंबई: राष्ट्रीय आणीबाणीला विरोध करताना तुरुंगवास भोगलेल्या बंदीजनांसाठी सरकारने सन्माननिधी सुरू केल्यानंतर आता प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय समारंभात निमंत्रित म्हणून सहभागी होण्याचा मान मिळणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे शासन परिपत्रक जारी केले.

राज्यात प्रजासत्ताक दिन -२६ जानेवारी, महाराष्ट्र दिन -१ मे आणि स्वातंत्र्यदिन-१५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणांचे कार्यक्रम ध्वजारोहण आणि ध्वजवंदन करून साजरे केले जातात. या शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवरांना निमंत्रित केले जाते. विशेषत: त्या त्या विभागातील स्वातंत्र्य सैनिकांनाही या समारंभासाठी निमंत्रित केले जाते. आता १९७५ ते १९७७ या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात या निर्णयाला विरोध करताना ज्यांना कारावास भोगावा लागला अशा व्यक्तींचा सन्मान म्हणून त्यांना जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सन्मानपूर्वक निमंत्रित करावे, असे शासन परिपत्रक साामान्य प्रशासन विभागाकडून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासाठी काढण्यात आले आहे.

संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचेनानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना अवगत करावे, असेही परिपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वी आणीबाणीत कारावास भोगलेल्या बंदीजनांना महिना २० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.