इंधन स्वस्ताई लवकरच ; नव्या सरकारची पहिली भेट : मूल्यवर्धित करकपातीची घोषणा

राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती.

eknath-shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील स्मृतीस्थळास भेट दिली़ छाया : दीपक जोशी

मुंबई : भाजपशासित राज्यांनी केलेल्या करकपातीच्या धर्तीवर राज्यातही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केली. हा कर किती कमी करणार, याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतरच इंधन प्रत्यक्षात स्वस्त होईल.

वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने मे महिन्यात पेट्रोलवरील अबकारी करात आठ रुपये, तर डिझेलवरील करात सहा रुपये कपात केली होती. त्यावेळी राज्य सरकारांनीही मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. त्यानुसार भाजपशासित राज्यांनी करात कपात केली होती. मात्र, बिगर-भाजपशासित राज्यांनी कपात करण्याचे टाळले होते. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर-भाजपशासित राज्यांना कानपिचक्या देत कर कमी करण्याचे आवाहन केले होते.

पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केल्याचा दावा केला होता. मात्र, सरकारने कोणतीही इंधन दरकपात न करता केंद्राच्या निर्णयाचाच लोकांना लाभ दिल्याचा आरोप भाजपने केला होता.

राज्यात सत्तांतर होताच इंधन करकपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर केली़ भाजपशासित राज्यांप्रमाणे राज्यातही इंधनावरील कर कमी करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नव्या सरकारची भूमिका स्पष्ट करताना शिंदे यांनी तीन निर्णय जाहीर करीत शेतकरी आणि जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात न करताच इंधन दरकपात केल्याचे सांगत जनतेची फसवणूक केली. मात्र, आपले सरकार लवकरच इंधनावरील मूल्यवर्धित करात कपात करणार असून, त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, असे जाहीर केले. तसेच रायगडच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वागिण विकासासाठी २१ कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्याच्या विकासातील शेतकऱ्यांचे योगदान सर्वाधिक असून, त्यांना भरभरून मदत देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यातून लवकरच शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

फडणवीस हे मोठे कलाकार

‘‘राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यायला हवे होते. त्यासाठी मी बाहेरून तीन मतांची व्यवस्था केली होती. तरीही पराभव झाला. कारण, देवेंद्र फडणवीस मोठे कलाकार निघाले. त्यांनी आमच्याबरोबरच्या छोटय़ा पक्षांची-अपक्षांचीच मते भाजप उमेदवाराकडे वळवली’’, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी  सत्तांतराचे नाटय़ विधानसभेत उलगडल़े  ‘‘सत्तांतरामागे फडणवीस यांची कलाकारी आह़े  त्यांनीच सारे काही घडवून आणल़े  आम्ही दोघे कधी भेटायचो, हे आमच्या लोकांनाही कळायचे नाही’’, असे शिंदे म्हणाल़े

विश्वासदर्शक ठराव जिंकला

एकनाथ शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत मंजूर झाला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे नऊ आमदार अनुपस्थित राहिल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले. मात्र, वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत पोहोचू शकलो नाही, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra government to soon reduce vat on fuel says cm eknath shinde zws

Next Story
शिवसैनिक शिवसेनेबरोबर! ; अजित पवार यांचा एकनाथ शिंदेंना इशारा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी