नुकतेच जामिनावर तुरुंगातून सुटलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. राणा दाम्पत्याला मिळालेल्या जामिनाला महाराष्ट्र सरकार आव्हान देणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाची घोषणा करून तुरुंगात गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला. रविवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना नवनीत राणा यांना हा धार्मिक लढा होता आणि तो पुढेही चालू ठेवणार आहे असे म्हटले होते. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हानही दिले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी छातीत दुखणे आणि उच्च रक्तदाबाची तक्रार केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. होते.

खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्च मिळ्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कारवाई होणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. सशर्त जामिनावर बाहेर आलेल्या राणा दाम्पत्याने न्यायालयाच्या अटींचे उल्लघन केल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली. जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालया मनाई केली असतानाही राणा दाम्पत्याने वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे याबाबत न्यायालयात जाणार असल्याचे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन देताना काही अटीही घातल्या होत्या. यातील एक अट अशी होती की त्यांनी या प्रकरणी बाहेर जाऊन माध्यमांशी बोलणार नाही. मात्र आता नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार त्यांच्या जामीनाविरोधात न्यायालयासमोर ही बाब मांडणार आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या पतीने न्यायालयाच्या अटीची पायमल्ली करून त्याचे उल्लंघन केले आहे, असा युक्तिवाद महाराष्ट्र सरकारच्या वतीने न्यायालयात केला जाऊ शकतो. अशा स्थितीत त्यांचा जामीन रद्द करून त्यांची पुन्हा तुरुंगात रवानगी होऊ शकते.

“नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालयाने जी अट घातली होती की, त्यांनी गुन्ह्याशी संबधित कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर बोलायचे नाही या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आम्ही सोमवारी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ. कारण अशा प्रकारची विधाने त्यांनी माध्यमांसमोर केल्यास त्यांना दिलेल्या जामिनाच्या अटीचे उल्लंघन समजण्यात येईल आणि जामीन रद्द समजण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे,” असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढण्याचे आव्हान

नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरणार – नवनीत राणा

“मुंबई महापालिका निवडणुकीत मी पूर्ण ताकदीने उतरणार आहे. शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी जनतेमध्ये जाईन. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा आणि रामाचं नाव घेणाऱ्यांना त्रास दिल्यानंतर काय परिणाम होतात हे दाखवून देईल,” असंही राणा म्हणाल्या.