मुंबई : चंगळवादी प्रवृत्तीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. आपण आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा नाश करत आहोत, चंगळवादी प्रवृत्तीपेक्षा निरोगी आरोग्य महत्त्वाचे असून त्यासाठी आपण आपल्या मूळ भारतीय संस्कृतीनुसार निसर्गाशी जोडलेले राहायला हवे, असे मत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गुरुवारी व्यक्त केले.

सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज असून रासायनिक खतांचा वापर थांबायला हवा, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून आरोग्यावरही गंभीर परिमाण होत आहेत. यासाठी पर्यावरण तज्ज्ञांनी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असेही ते पुढे म्हणाले.

वांद्रे येथील जिओ कन्विशनल वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई क्लायमेट वीक’ या तीन दिवसीय उपक्रमाची सांगता गुरुवारी झाली. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्थी, प्रोजेक्ट मुंबईचे शिशिर जोशी, प्रोजेक्ट मुंबईचे जलज दानी आणि डेलॉईट इंडियाच्या तियासा खानरा आदी मान्यवर उपस्थित होते.

आपण निसर्गापासून दूर जात आहोत. यामुळे आपल्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निसर्ग संवर्धनाबाबत आता सावध झालो नाही, तर येणाऱ्या काळात आपल्याला गंभीर प्रश्नांना सामोरे जावे लागेल, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगतानाच शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा वापर करण्याचा संदेश दिला.

पर्यावरणविषयक परिषदांमधील चर्चा केवळ बौद्धिक पातळीवर न राहता त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. शहराचा विकास, वाढ आणि हवामान जबाबदारी या तिन्ही गोष्टी समन्वयाने पुढे नेण्याची आवश्यकता असून हवामान बदलाच्या समस्येसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अधोरेखित केली.

तर ‘मुंबई क्लायमेट वीक’ ही केवळ एक परिषद नसून नागरिकांची चळवळ व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून ‘मुंबई क्लायमेट वीक’ हा मुंबईकरांच्या रोजच्या चर्चेचा आणि हवामान कृतीचा भाग व्हावा, असे मत प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई क्लायमेट वीक इन्होवेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांचा सन्मान करण्यात आला.