मुंबई : आंतराष्ट्रीय शहर असले तरी मुंबईमध्ये क्षयरुग्णांची संख्या लक्षणीय आहे. हा संसर्गजन्य आजार नियंत्रणात आणण्यासाठी केवळ शासकीय प्रयत्न किंवा उपक्रम पुरेसे ठरणार नाहीत. तर, त्यासाठी लोकचळवळ उभी राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुंबईला क्षयरोगापासून मुक्त करण्यासाठी ‘क्षयरोमुक्त मुंबई’ अभियान सुरू केले आहे. मुंबई क्षयरोगमुक्त झाली, तर हे महानगर जगासाठी आदर्श ठरेल, असा आशावाद राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र लोकभवन आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या संकल्पनेतून ‘क्षयरोगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ राज्यपाल वर्मा यांच्या हस्ते व मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली धारावीतील लोकनेते श्री. एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र व शीव रुग्णालयात करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त अभियाना’ची प्रेरणा घेऊन ‘क्षयरोगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान केवळ शासकीय सोपस्कार नसून, जनसेवेसाठी चालणारी लोकचळवळ म्हणून पुढे यायला हवी. क्षयरोगाबद्दल व्यापक जनजागृती आणि वेळेवर निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘शुभं करोति कल्याणं’ या श्लोकात आरोग्य आधी आणि त्यानंतर धनसंपदा येते. त्यामुळे, कोणत्याही धनापेक्षा आरोग्य महत्त्वाचे आहे, हे विसरता कामा नये. भारताला आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ करण्यासाठी सुदृढ महाराष्ट्र, सशक्त महाराष्ट्र, सुदृढ मुंबई होणे गरजेचे आहे. आपण मुंबईला क्षयरोगमुक्त करण्यात यशस्वी झालो, तर हे केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल, असा विश्वास वर्मा यांनी व्यक्त केला.
अविरत धावणाऱ्या मुंबईपुढे सर्वात मोठे आव्हान हे औषध-प्रतिरोधक क्षयरोगाचे आहे. आपले शेजारी, लोकल प्रवासातील सोबती किंवा आपल्याच वस्तीत राहणारा कोणी तरी या आजाराशी लढा देत आहे. संसर्गाची ही साखळी आपण तोडत नाही, तोपर्यंत मुंबईचा श्वास मोकळा होणार नाही. क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘लवकर निदान आणि तात्काळ मोफत उपचार’ या सूत्रावर भर देण्यात येणार आहे.
मुंबईच्या सर्व २४ विभागांमध्ये आयोजित आयुष्यमान आरोग्य शिबिरांमध्ये एआय सपोर्टेड हँडहेल्ड एक्स रे यंत्राचा वापर केला जात आहे. हे यंत्र थेट वस्त्यांमध्ये, लोकांच्या दारापर्यंत नेऊन काही सेकंदांत छातीचा क्ष किरण काढता येतो. डेटा, तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांचा संगम असणारे हे अभियान येत्या काळात सार्वजनिक आरोग्याचे यशस्वी मॉडेल ठरेल, याचा विश्वास महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.
प्रत्येक मुंबईकराच्या आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित भवितव्यासाठी क्षयरोग मुक्त मुंबई जनआंदोलनाची सुरुवात होत आहे. भारतातील क्षयरोगाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ३ टक्के रुग्ण हे मुंबईत आहेत. एमडीआर रेझिस्टंट रुग्णांचे प्रमाण देशाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत मुंबईत सुमारे ८ टक्के आहे. म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा राष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचा असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले.
राज्यपालांनी ३० क्षयरुग्णांना घेतले दत्तक
धारावी येथील लोकनेते श्री. एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात राज्यपाल, महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. रुग्णालयात हॅंडहेल्ड एक्स रे यंत्र भेट देण्यात आले. अभियानाची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याबरोबरच राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात सहभागी स्वयंसेवी संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्यपालांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी व आशा कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला. यावेळी राज्यपालांनी ३० क्षयग्रस्त रुग्णांना दत्तक घेतले. त्यामुळे त्यांना नि-क्षय मित्र म्हणून सन्मानित करण्यात आले.
