मुंबई : देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत असून यापैकी ४० टक्के प्लास्टिक हे नदी, नाले आणि भूगर्भात जात आहेत. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून नदी आणि समुद्र प्रदूषित होत असल्याने मत्यव्यवसाय, पर्यटन व्यवसायासह मानवी आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे. यामुळे प्लास्टिकला पर्याय शोधण्याची गरज असून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योगदान देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी गुरुवारी केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक वेष्टनाचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन मुंबई येथील हॉटेल ताज महाल पॅलेस येथे करण्यात आले होते. यावेळी जिष्णु देव वर्मा यांनी प्लास्टिकचे आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम यावर आपली मते मांडली.
स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही, यासाठी प्लास्टिकपासून पर्यावरणाला निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी, तसेच धोरणकर्त्यांनी या कार्यात पुढाकार घ्यावा. तसेच यासाठी विद्यार्थी आणि युवकांमध्ये, समाजातील सर्व स्तरांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरजही जिष्णु देव वर्मा यांनी अधोरेखित केली.
प्लास्टिक प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी शासन, उद्योजक आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक आर. केशवन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
