मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागार राव यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीत अक्षम्य हलगर्जीपणा आणि अपयश आल्याचा ठपका ठेवत राज्यपालांनी ही कारवाई केली आहे. मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल यंदा बराच काळ रखडले होते. संजय देशमुख यांनी ऑनलाइन पेपर तपासणीचा घाट घातल्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, या प्रयोगात विद्यापीठाला पूर्णत: अपयश आले. परीक्षा होऊन ४५ दिवसांची मुदत उलटल्यानंतर राज्यपालांनी पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. मात्र, या मुदतीतही विद्यापीठाला पेपर तपासणीचे काम पूर्ण करता आले नाही. ३१ जुलैची मुदत पाळण्यात विद्यापीठाला अपयश आल्यानंतर कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याला उत्तर देताना डॉ. देशमुख यांनी परीक्षा निकाल विलंबामागे घातपात असल्याचा आरोप केला होता. मात्र, असा कोणताही घातपात झाला नसल्याचे स्पष्ट होत असून ऑनलाइन मूल्यांकनाचे काम करणाऱ्या कंपनीच्या चुकीमुळे उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याचा अहवाल राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिला होता. त्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती. अखेर त्याची परिणीती देशमुख यांच्या हकालपट्टीत झाली.

माहिती व तंत्रज्ञान विभागाने ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या प्रक्रियेच्या कार्यवाहीचा अहवाल राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे सादर केला. त्यात विद्यापीठाने कोणत्याही पूर्वतयारीशिवाय ऑनस्क्रीन मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू केल्यानेच निकाल जाहीर होण्यास विलंब झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाने आखून दिलेली नियमावली धुडकावून विद्यापीठाने चुकीच्या पद्धतीने निविदा जाहीर करून तीन वेगवेगळ्या कंपन्यांची ऑनस्क्रीन मूल्यांकनासाठी निवड केली. मेरिट ट्रॅक ही यांच्यापैकी मुख्य कंपनी असून उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे सॉफ्टवेअर पुरविण्याची जबाबदारी या कंपनीला देण्यात आली होती. मात्र या कंपनीसोबत विद्यापीठाने कोणताही करार न करताच कामाची सुरुवात केल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. दुसरी कंपनी एस एस के इन्फोटेक असून मुख्य उत्तरपत्रिकेचे बारकोडचे पान स्कॅन करण्यासाठी तिची नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही कंपनीकडून आलेल्या माहितीनुसार अंतिम निकाल तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठाच्या सेंट्रल कम्प्युटिंग फॅसिलिटी या विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या कंपन्यांच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्याने निकाल विलंबाची परिस्थिती ओढवल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात आलेल्या ४७७ परीक्षांचे निकाल हे कोणतीही पूर्वतयारी न करता कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून घेतल्यानेच इतका काळ रखडले असल्याचे या अहवालातून मांडण्यात आले होते. हा अहवाल कुलगुरूंच्या विरोधात गेल्याने तसेच त्यांच्या घातपाताच्या दाव्यातही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यावरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले होते.