मुंबई: सर्वसामान्य व ग्रामीण जनतेला शासकीय सुविधा सहज मिळाव्यात. महसुली सेवांचा लाभ जलद गतीने व्हावा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी राज्यात ४ ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी तर ४७ ठिकाणी नवीन अप्पर तहसीलदार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, अपुरा अधिकारी व कर्मचारीवर्ग, तालुक्यांचे व जिल्ह्यांचे भौगोलिक अंतर, वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे नागरीकरण विचारात घेऊन प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, नवीन कार्यालयांमुळे शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य जनतेला विविध दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय सेवा घरपोच व वेळेत मिळण्यास या निर्णयामुळे मोठा हातभार लागणार आहे.

प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील बारामती, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि नागपूर जिल्ह्यातील नागपूर (ग्रामीण) येथे नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे.

२१ जिल्ह्यात ४७ अपर तहसीलदार कार्यालये

गडचिरोली जिल्हयात कुरखेडा, आरमोरी, धानोरा, सिरोंचा, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील अनुक्रमे मालेवाडा, वैरागड, पेंढरी, आसरअल्ली, कसनसूर व जिमलगट्टा येथे अप्पर तहसीलदार कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. अशाच प्रकारे भंडारा जिह्यात पवनी तालुक्यातील अड्याळ, वर्धा जिह्यात हिंगणघाट व सेलू तालुक्यातील अनुक्रमे अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथे, नागपूर जि्हयात नागपूर (ग्रामीण), हिंगणा, नागपूर (शहर), कामठी, काटोल, नरखेड, मौदा व कुही तालुक्यातील अनुक्रमे बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, पारडी, वडोदा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी व वेलतूर येथे अप्पर तहसीलदार कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.तसेच वाशिम जिह्यात कारंजा तालुक्यातील कामरगाव, जालना जिह्यात जालना तालुक्यातील नेर,

सातारा जिल्हयातील फलटण व कऱ्हाड तालुक्यातील अनुक्रमे साखरवाडी व उंब्रज, पुण्यात खेड तालुक्यातील चाकण, पालघरमध्ये कासा, विरार व बोईसर आणि मुंबई उपनगरात चेंबूर, मालाड व वांद्रे येथे अप्पर तहसीलदार कार्यालये सुरु होणार आहेत.

राज्यातील तळागाळातील, ग्रामीण व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना महसुली सेवांचा लाभ अत्यंत सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठीच ही कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री