मुंबई : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांमधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या दहिहंडीच्या सुट्टीत बदल करण्याचा सुधारित आधेश सोमवारी जारी करण्यात आला. या बदलामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवस सलग सुट्टी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांसाठी दहिहंडीची शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शनिवारी शासकीय कार्यालये बंदच असतात. यामुळेच आता दहिहंडीची स्थानिक सुट्टी ही रक्षाबंधनाच्या दिवशी शुक्रवार, २८ ऑगस्टला देण्याचा नवीन आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला. या सुट्टीतील बदलामुळे कर्मचाऱ्यांना पाच दिवस सलग सुट्टी घेणे शक्य होणार आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना बुधवार, २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादची सुट्टी आहे. शुक्रवार, २८ तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी मिळणार आहे. त्यानंतर शनिवार व रविवारची सुट्टी आहे. म्हणजेच २७ तारखेला नारळी पोर्णिमेच्या दिवशी एक दिवस नैमित्तीक सुट्टी घेतल्यास पाच दिवस सुट्टी मिळू शकेल.
