हाजी अली महिला प्रवेशाच्या वादात..
एखाद्या धर्माच्या अंतर्भूत गाभ्याचा भाग नसलेल्या प्रथा-परंपरा या समानतेच्या आड येऊ शकत नाहीत. त्यामुळे हाजी अली दग्र्यातील ‘मझार’ परिसरात जाण्यास महिलांना घातलेल्या बंदीला कुराणात समर्थन आहे का, हे ट्रस्टने सिद्ध करावे. ही बंदी मौलानांच्या सांगण्यावरून घातली असेल तर ती अयोग्य आणि अस्वीकारार्ह आहे, अशी भूमिका मंगळवारी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयात मांडण्यात आली. एवढेच नव्हे, तर प्रार्थना करणे ही जर धार्मिक परंपरा आहे तर महिलांना प्रार्थनेपासून रोखणे किती योग्य, असा सवालही सरकारच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
हाजी अली दग्र्यातील ‘मझार’ परिसरात महिलांना घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील डॉ. नूरजहाँ काझी यांनी केलेल्या याचिकेवर न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आतापर्यंत या प्रकरणापासून स्वत:ला दूर ठेवणाऱ्या सरकारने पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली. दग्र्यातील ‘मझार’ परिसरात महिलांना घातलेली बंदी ही कुराणचा भाग असेल वा धर्माच्या अंतर्भूत गाभ्यानुसार असेल तर ती योग्य आहे. मात्र कुराणाचा अन्वयार्थ काढून ती घातली असेल तर ती चूक आहे. त्यामुळे महिलांनाही या परिसरात जाण्याची परवानगी दिली पाहिजे. राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार समानतेच्या निकषावरही बंदी अयोग्य असल्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी सरकारच्या वतीने सांगितले.
ताजमहलमधील मुमताजची कबर, फतेहपूरचा सलीम चिश्ती दर्गा, नागपूर येथील ताजुद्दिनबाबा दर्गा व अजमेर शरीफ दग्र्यात महिलांना ‘मझार’मध्ये जाण्यासही परवानगी आहे, याकडेही अणे यांनी लक्ष वेधले.
पुरुष प्रेषिताची ही मझार असल्याने महिलांनी त्याला स्पर्श करणे हे पाप आहे. कुराणत तसे स्पष्ट नमूद असल्याचा दावा ट्रस्टने केला.

हाजी अली दग्र्यातील परिस्थिती शबरीमला आणि शनिशिंगणापूरपेक्षा वेगळी आहे. तेथे पूर्वापार महिलांना प्रवेश दिला गेलेला नाही. उलट गेली १४७ वर्षे महिलांना हाजी अलीतील ‘मझार’च्या परिसरात जाऊ दिले जात होते. त्यानंतर महिलांचा तेथील प्रवेश हे पाप असल्याचे काही मौलानांनी सांगितल्यावर २०१२ मध्ये अचानक ही बंदी घालण्यात आली, असे याचिकाकर्त्यां डॉ. नूरजहाँ काझी यांच्या वतीने सांगण्यात आले.