मुंबई : नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याबाबत सरकारचे काही निकष आहेत. या निकषांना बाजूला सारून श्रेयासाठी घाई करण्याचा प्रकार मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या मदतीमुळे समोर आला आहे.

दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा जाहीर करीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार हंडी फोडताना सातव्या थरावरून पडून मृत्यू झालेल्या संदेश दळवी यांच्या कुटुंबीयांना तातडीने दहा लाख रुपयांची मदत दिली जाईल, हा तपशील मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केल्यानंतर तातडीने धनादेश गोविंदाच्या कुटुंबीयांना देण्याकरिता शिंदे गटातील एका आमदाराची धावाधाव सुरू झाली. पण धनादेश कोणत्या शीर्षांतून काढावा याचा खल सुरू झाला. शेवटी मुख्यमंत्री सहायता निधीतून धनादेश तयार करण्यात आला.

गोविंदाच्या मृत्यूचा मुद्दा शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी उपस्थित केला. दहीहंडी उत्सवात मृत्यू वा जखमी झालेल्या गोविंदांना मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, मात्र अनेक गोविंदा जखमी असून त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. तसेच संदेश दळवी या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांनाही मदत मिळाली नसून याबाबत तातडीने कारवाई करम्ण्याची मागणी चौधरी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. त्यावर मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच शिंदे गटातील एका आमदाराची धावाधाव सुरू झाली. कारण मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतीचा धनादेश सुपूर्द करायचा होता. मदत मिळण्यास विलंब झाल्यास शिवसेना तो मुद्दा तापविण्याची भीती शिंदे गटाला होती. मग या आमदाराने मुख्यमंत्री सचिवालयात धाव घेतली. तेथे धनादेश तात्काळ मिळावा, अशी मागणी त्याने केली. आता धनादेश कोणत्या शीर्षांखाली द्यावा, असा प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना पडला. मग मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्याचा पर्याय स्वीकारला गेला.

अपघाती मृत्यू असल्यास मदतीपूर्वी शवचिकित्सा प्रमाणपत्र सादर करावे लागते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ मदत दिली हे चित्र समोर यावे म्हणून सारी धावपळ सुरू झाली. शेवटी धनादेश निघाला आणि हे आमदार विधान भवनातून बाहेर पडले. 

आयोजकाला अटक

मुंबई: विलेपार्ले पूर्व येथे दहीहंडी फोडण्यासाठी थर लावत असताना वरून पडून एका गोविंदाचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दहीहंडी आयोजकाला मंगळवारी अटक केली. हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आयोजक रियाज मस्तान शेख (३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. शेखला पोलिसांनी जामीन दिला आहे.

शेख विलेपार्ले येथील वाल्मीकी नगर येथील रहिवासी आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असून गोपाळकालानिमित्त शेखने त्यांच्याच परिसरात दहीहंडीचे आयोजन केले होते. त्या वेळी चेंबूरकरवाडी येथील शिवशंभो गोविंदा पथक तेथे दहीहंडीसाठी आले होते. त्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी थर रचले. त्यावेळी त्यांचे थर कोसळले. या घटनेत वरून पडल्यामुळे विनय शशिकांत रबाडे आणि संदेश प्रकाश दळवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यातील संदेश दळवी यांचा मंगळवारी नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दळवीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने जाहीर केलेला दहा लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

काय घडले?

दहीहंडी फोडताना मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांच्या नातेवाईकांना दहा लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानुसार विलेपार्ले पूर्व येथील संदेश दळवी या मृत गोविंदाच्या कुटुंबीयांना धनादेश देण्याकरिता शिंदे गटातील एका आमदाराने पुढाकार घेतला. नंतर धनादेश कोणत्या शीर्षांखाली द्यावा याचा खल करीत अखेर ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वळविण्यात आली.