मुंबई : राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्या सर्व व्यापारी दुकाने, बार, उपाहारगृहे, मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. उपाहारगृहांमध्ये एकू ण क्षमतेच्या ५० टक्के  इतक्याच ग्राहकांना प्रवेशास मुभा आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी व्यापारी तसेच उपाहारगृहांच्या मालकांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीतही वेळमर्यादा शिथिल करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेषत: उपाहारगृहांना रात्री १० पर्यंतच मुभा असल्याने रात्री उशिरा बाहेर पडणाऱ्यांचे हाल होतात. त्यामुळे उपाहारगृहे व बारमालकांकडून वेळेची मर्यादा वाढवून देण्याची मागणी करण्यात येत होती.

करोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा, महाविद्यालये, चित्रपट तसेच नाटय़गृहे खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. दिवाळीपर्यंत खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकाने, मॉलच्या वेळेतही वाढ करण्याबाबत सरकारच्या पातळीवर विचारविनिमय झाला. या पार्श्वभूमीवर दुकाने, उपाहारगृहे, मॉलवरील निर्बंध आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  बंद सभागृहातील २०० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा आता उठविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता लशीची एक मात्रा घेतलेल्यांना आणि आरोग्यसेतू अ‍ॅपवर आरोग्य स्थिती चांगली असलेल्यांना मॉलमध्ये जाण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.

‘मुलांच्या लसीकरणाबाबत अंतिम निर्णय लवकरच’

अठरा वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाबाबत अंतिम निर्णय वैज्ञानिक तर्क, लसपुरवठा आदी मुद्दय़ांच्या आधारावर घेण्यात येईल, असे करोना कृतिदलाचे अध्यक्ष व्ही. के. पॉल यांनी रविवारी स्पष्ट केले. अनेक देशांनी मुलांचे लसीकरण सुरू केले आहे. मात्र, आपल्याकडे मुलांच्या लसीकरणाबाबत सर्वंकष विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी झायडस कॅडिलाच्या लशीला आपत्कालीन वापराची परवानगी मिळाली आहे. तसेच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीला २ ते १८ वयोगटासाठी आपत्कालीन वापरास परवानगी द्यावी, अशी शिफारस तज्ज्ञ समितीने औषध महानियंत्रकांकडे केली असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

करोनाचे १,७१५ नवे रुग्ण

मुंबई  : राज्यात करोना रुग्णसंख्या घटत असून, दिवसभरात १,७१५ नव्या रुग्णांची नोंद झाली. दुसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळलेल्या विदर्भ आणि मराठवाडय़ात रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये या कालावधीत एकही नवा रुग्ण आढळला नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील दोन जिल्ह्य़ांमधील रुग्णही कमी झाले आहेत. दिवसभरात मुंबई ३६६, नगर २१७, पुणे जिल्हा २३७, पुणे शहर १०६, सातारा ६९, सोलापूर ६४ रुग्ण आढळले.

एक लसमात्रा घेतलेल्यांनाही सवलत?

’मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्या कमी झाली असून, लशीची एक मात्रा घेतलेल्यांनाही दिवाळीनंतर उपनगरी रेल्वे, मॉल व अन्यत्र प्रवेश देण्याबाबतच विचार सुरू आहे.

’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृतिगटाशी चर्चा करून दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी सांगितले. राज्यात करोना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

’दिवाळीनंतर रुग्णसंख्येचा आढावा घेऊन व कृतिगटाशी चर्चा करून एक लस मात्रा घेतलेल्यांनाही सर्वत्र मुभा देण्याचा विचार होऊ शकेल, असे टोपे म्हणाले.