खासगी रुग्णालयांकडून होणारी गरीब रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकार लवकरच नवीन कायदा करणार असून त्यामुळे कोणत्या उपचारासाठी किती शुल्क असेल याची यादीच प्रत्येक रुग्णालयात लावली जाणार आहे. त्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, तसेच मुंबईत लवकरच ‘मोटर बाइक रुग्णवाहिका’ योजना सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून त्यात गुडघा प्रत्यारोपण, सर्पदंश अशा आजारांचा समावेश करण्यात येणार आहे. तरंगत्या दवाखान्याची योजना अलिबाग ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सुरू केली जाणार आहे. मुंबईत मोटर बाइक रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच मुंबईत  या रुग्णवाहिका धावू लागतील, असेही सावंत म्हणाले.