विनोद तावडे, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर अशा एकापाठोपाठ मंत्र्यांवर होणाऱ्या गैरव्यवहारांच्या आरोपांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच सत्ताधारी भाजपने मदरशांचा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केला. तसेच सध्याच्या एकूणच अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे भाजपचे सरकार केव्हाही पडू शकते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मदरशांमधील विद्यार्थ्यांची शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये गणना करण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. वैदिक अभ्यासक्रम तसेच मदशरांमध्ये शालेय अभ्यासक्रमाचे धडे देऊ नयेत, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे आदेश आहेत. या आदेशाच्या नेमकी विरोधी भूमिका सरकार घेत असल्याचा आरोप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. विनोद तावडे यांच्या शैक्षणिक पदवीचा वाद निर्माण झाला. तसेच त्यांच्या खात्यातील खरेदीचे प्रकरण गाजले. पंकजा मुंडे यांच्या खात्याच्या माध्यमातून २०६ कोटी रुपयांच्या खरेदीत झालेला गैरव्यवहार काँग्रेसने चव्हाटय़ावर आणला आहे. भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी पक्षाच्या नेत्यांवरच टीकेची झोड उठविली. या साऱ्या आरोपांमुळे भाजपची सारी लक्तरे चव्हाटय़ावर आली आहेत. आणखी काही प्रकरणे बाहेर येणार आहेत. यामुळेच भाजपने मदरशांचा मुद्दा मांडून मतांचे ध्रुवीकरण करण्याबरोबरच लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
साखरेच्या मुद्दय़ावर केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांद्याचे निर्यातमूल्य वाढविण्यात आल्याने कांदा उत्पादत शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. साखरेबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुढील हंगामात साखर कारखाने सुरू होणे कठीण असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ९ आणि १० तारखेला राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पुणे आणि सातारा, माजी मुख्यमंत्री नारायण राणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील नगर जिल्ह्यांमध्ये आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पूर्ण कर्जमाफी जाहीर न झाल्यास आगामी विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला.
मंत्र्यांवरील आरोप व कर्जमुक्ती या दोन मुद्दय़ांवर पक्षाच्या वतीने राज्यपाल व्ही. विद्यासागर राव यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.