मुंबई : वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली लागू होऊन नऊ वर्षे होत आली असताना राज्याच्या वस्तू व सेवा कर विभागातील राज्यकर निरीक्षक आणि राज्यकर अधिकारी या दोन संवर्गांच्या विभागीय परीक्षांच्या अभ्यासक्रमात आणि स्वरूपात राज्य सरकारने महत्त्वाचे बदल केले आहेत. जीएसटी कायद्याच्या तरतुदी, करप्रशासनातील प्रत्यक्ष कामकाज, संगणकीय प्रणाली, लेखांकन सॉफ्टवेअर तसेच न्यायालयीन कामकाजाशी संबंधित विषयांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. वित्त विभागाने २ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातील स्वतंत्र निर्णय काढला आहे. सुधारित परीक्षा स्वरूप २०२६-२७ या परीक्षा वर्षापासून किंवा आगामी विभागीय परीक्षेपासून लागू होणार आहे.
महाराष्ट्रात राज्यकर निरीक्षकांच्या २३०० तर अधिकाऱ्यांच्या दीड हजारांच्या आसपास जागा आहेत. राज्यकर निरीक्षक संवर्गासाठी विभागीय परीक्षा १९७२ मधील नियमांनुसार, तर राज्यकर अधिकारी संवर्गासाठी १९७३ मधील नियमांनुसार घेतली जात होती. २०१० मध्ये विक्रीकर कायद्यातील बदलांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संवर्गांच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आली होती. मात्र, १ जुलै २०१७ पासून राज्यात जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर विभागीय परीक्षांमध्येही या कायद्याशी संबंधित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार आता दोन्ही संवर्गांच्या परीक्षांचे स्वरूप आणि अभ्यासक्रम बदलण्यात आले आहेत.
जीएसटीवरील प्रश्नाना सर्वाधिक गुण
राज्यकर निरीक्षकांची विभागीय परीक्षा सहा प्रश्नपत्रिकांची असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिका १०० गुणांची आहे. पहिल्या प्रश्नपत्रिकेत विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या करकायद्यांचा समावेश असून, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ आणि त्याअंतर्गत नियमांना सर्वाधिक ७० गुण देण्यात आले आहेत. महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायदा, केंद्रीय विक्रीकर कायदा आणि व्यवसाय कर कायद्याचाही अभ्यास करावा लागणार आहे.
दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र नागरी सेवा नियम, माहितीचा अधिकार कायदा, सार्वजनिक अभिलेख कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम यांचा समावेश आहे. तिसरी प्रश्नपत्रिका संगणक आणि विभागाच्या स्वयंचलित कार्यप्रणालीवर आधारित असेल. यामध्ये लेखी आणि प्रात्यक्षिक अशा प्रत्येकी ५० गुणांच्या परीक्षा होतील. एमएस एक्सेल, एमएस वर्ड, पॉवरपॉइंट, ई-मेल तसेच विभागाच्या बॅक ऑफिस प्रणालीचे ज्ञान तपासले जाणार आहे. करदात्यांची नोंदणी, माहिती शोधणे, परतावा, अपील, करनिर्धारण आणि वसुली यांसारख्या कामांचा यात समावेश आहे.
चौथ्या प्रश्नपत्रिकेत वाणिज्य लेखे, दुहेरी नोंद पद्धती, ताळेबंद आणि विविध व्यावसायिक संस्थांचा अभ्यास असेल. टॅली आणि झोहो बुक यांसारख्या लेखांकन सॉफ्टवेअरची प्राथमिक माहितीही आवश्यक असेल. पाचव्या प्रश्नपत्रिकेत जीएसटी लेखापरीक्षण, ई-वे बिल, तपासणी, अटक आणि अभियोजन यासंबंधीची नियमपुस्तके आणि परिपत्रके, तर सहाव्या प्रश्नपत्रिकेत भारतीय साक्ष अधिनियम, मालविक्री अधिनियम आणि भारतीय करार अधिनियमाचा समावेश आहे.
राज्यकर अधिकाऱ्यांसाठी सात प्रश्नपत्रिका
राज्यकर अधिकारी संवर्गाची विभागीय परीक्षा सात प्रश्नपत्रिकांची असेल. प्रत्येक प्रश्नपत्रिका १०० गुणांची आणि तीन तासांची असेल. सर्व प्रश्नपत्रिका वर्णनात्मक स्वरूपाच्या असतील. पहिल्या प्रश्नपत्रिकेत करकायदे आणि न्यायालयीन निवाड्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र जीएसटी कायदा आणि त्यासंबंधीच्या नियमांना ६० गुण, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्याला १० गुण, केंद्रीय विक्रीकर कायद्याला १० गुण, तर निवडक न्यायालयीन निवाड्यांना २० गुण देण्यात आले आहेत.
दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत भारतीय करार अधिनियम, मालविक्री अधिनियम, सीमाशुल्क कायदा आणि भारतीय साक्ष अधिनियम यांचा अभ्यास करावा लागणार आहे. तिसऱ्या प्रश्नपत्रिकेत जीएसटी लेखापरीक्षण, ई-वे बिल, तपासणी, अटक आणि अभियोजन यासंबंधीच्या नियमपुस्तिका व परिपत्रकांना ८० गुण आहेत. चौथ्या प्रश्नपत्रिकेत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, तर पाचव्या प्रश्नपत्रिकेत भारतीय लेखा व लेखापरीक्षण, राज्याचे अर्थसंकल्पीय नियम आणि विविध शासकीय कायद्यांचा समावेश आहे. सहाव्या प्रश्नपत्रिकेत महाराष्ट्र नागरी सेवा नियम, तर सातव्या प्रश्नपत्रिकेत व्यावसायिक लेखे, विविध व्यावसायिक संस्था आणि टॅली, झोहो बुक यांसारख्या लेखांकन सॉफ्टवेअरच्या प्राथमिक ज्ञानाची परीक्षा होईल.
यामुळे विभागीय परीक्षांमध्ये केवळ कायद्यांचे सैद्धांतिक ज्ञान नव्हे, तर करप्रशासनातील प्रत्यक्ष कामकाज आणि तांत्रिक कौशल्यांनाही महत्त्व मिळणार आहे. या बदलांमुळे विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे परिणाम, पदोन्नती, सेवाज्येष्ठता किंवा वेतननिश्चिती यासंबंधीच्या विद्यमान नियमांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे एम स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्य मुद्दे
- जीएसटी लागू झाल्यानंतर विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात सुधारणा.
- सहा प्रश्नपत्रिकांद्वारे करकायदे, संगणकीय प्रणाली आणि लेखांकनाचे ज्ञान तपासले जाणार.
- टॅली, झोहो बुक यांसारख्या सॉफ्टवेअरचा समावेश.
- करनिर्धारण, अपील, वसुली आणि अंमलबजावणीच्या प्रत्यक्ष कामकाजावर भर.
