Cancer cases in Maharashtra 2026: सार्वजनिक आरोग्य विभागाने कर्करोगाचे वेळेत निदान व्हावे यासाठी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेत वर्षभरात तब्बल १ हजार ६७७ कर्करोग रुग्णांचे निदान झाले. यापैकी ४१६ रुग्णांवर सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख, गर्भाशयमुख व स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा समावेश आहे.

कर्करोग जनजागृती, लवकर निदान व उपचार या त्रिसूत्रीवर आधारित गतवर्षी ४ फेब्रुवारीपासून राज्यव्यापी कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेमध्ये ३० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्याला प्राधान्य देत मुख, गर्भाशयमुख व स्तन कर्करोगाच्या तपासणीवर भर देण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यभरातून ३ कोटी ५ लाख नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ४१ हजार १६९ कर्करोग संशयित रुग्ण आढळले. या रुग्णांची बायोप्सी करण्यात आली. यामध्ये १ हजार ६७७ जणांमध्ये कर्करोग निश्चित झाल्याचे निदान झाले. वर्षभरामध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये स्तन कर्करोगासाठी ८५ लाख ९९ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४७१ रुग्णांचे निदान झाले. तसेच गर्भाशयमुख कर्करोगासाठी ५६ लाख ४९ हजार महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २४३ रुग्णांना कर्करोगाचे निदान करण्यात आले.

कर्करोग तपासणी अधिक सुलभ व्हावी, यासाठी राज्यात कर्करोग निदान व्हॅनसेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील प्रत्येक परिमंडळासाठी एक अशा एकूण ८ तपासणी व्हॅन कार्यरत असून, त्याद्वारे राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये तपासणी होत आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगासाठी २ लाख ४७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार ३८३ बायोप्सी नमुने संकलित करण्यात आले असून ११२ रुग्णांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्याचप्रमाणे कर्करोगाच्या अन्य प्रकारातील रुग्णांचेही निदान या मोहिमेमध्ये करण्यात आले. मागील वर्षभरामध्ये कर्करागाचे निदान झालेल्या या रुग्णांपैकी ४१६ रुग्णांवर राज्यातील विविध सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत.

कर्करोग डे केअर युनिट

कर्करोग रुग्णांना उपचारासाठी दूर प्रवास करावा लागू नये, यासाठी राज्यात कर्करोग डे केअर युनिट (किमोथेरपी केंद्रे) सुरू करण्यात आली आहेत. सध्या राज्यात ८ किमोथेरपी केंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय, महाराष्ट्र कर्करोग योद्धा (एमसीडब्ल्यू) हा उपक्रम कर्करोग उपचार सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. टाटा रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट व विशेषज्ञ डॉक्टरांचे हे स्वयंसेवी नेटवर्क असून, या अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर दर दोन महिन्यांनी जिल्हा रुग्णालयांना भेट देतात. गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी, निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाते.