मुंबई : सुमारे अडीच ते तीन कोटी रुपयांची ७६ आलिशान वाहने घेऊन त्याचा फिरता दवाखाना करण्याचा उद्योग ही उधळपट्टी असून आरोग्य विभागाला आर्थिकदृष्ट्या हे परवडणारे नसल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या एका आलिशान वाहनासाठी डॉक्टर,तंत्रज्ञ, परिचारिका व अन्य कर्मचारी तसेच देखभालीसाठी वार्षिक ११ कोटी म्हणजेच ७६ गाड्यांसाठी सुमारे १३८ ते १४० कोटी रुपये खर्च येणार आहे. किमान १० वर्षे हा फिरता दवाखाना चालवायचा झाल्यास २००० कोटींपेक्षा जास्त खर्च येणार असून हा निधी आणायचा कुठून असा प्रश्न आरोग्य विभागापुढे निर्माण झाला आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात पुरेशी आरोग्य व्यवस्था आहे. ३६४ ग्रामीण रुग्णालये, ९५ उपजिल्हा रुग्णालये तसेच १,९१३ प्राथमिक आरोग्य केंद्रे रुग्णांवरील उपचारासाठी सज्ज असताना तीन कोटींच्या या आलिशान फिरत्या दवाखान्याची आवश्यकता काय असा सवाल वित्त विभागाने केला आहे. या तीन कोटींच्या वाहान खरेदीच्या प्रस्तावावरून अलीकडेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकामक झाली होती. वित्त विभागाने हा प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
हेही वाचा…धो-धो पावसात ठाकरे गटाचे आंदोलन
सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या तीन कोटीच्या वाहन खरेदीवर जी लेखी भूमिका मांडली आहे ते पाहाता हा प्रस्ताव आरोग्य विभागाचा नसल्याचे स्पष्ट होते. तानाजी सावंत यांच्या म्हणण्यानुसार सदर वाहन खरेदीचा प्रस्ताव हा मुख्यमंत्री कार्यालयाकडून आरोग्य विभागाला सादर करण्यात आला आहे. वित्त व विधि विभागाच्या मतानुसार यावर कार्यवाही व्हावी, अशी लेखी भूमिका आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली आहे.आरोग्य विभागाने अशा प्रकारच्या फिरत्या दवाखान्याच्या खेरदीचा कोणताही प्रस्ताव मांडला नसल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
तीन कोटींच्या या वाहनरुपी फिरत्या दवाखान्याच्या किमतीत तीन मर्सिडिज गाड्या वा ह्रदयविकारावरील उपचारासाठीची कॅथलॅब घेता येऊ शकते असे वित्त विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकार्याने सांगितले. प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागात रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिका ज्यात ऑक्सिजन व अन्य आवश्यक उपकरणे असले तरी पुरसे असते. अशी व्यवस्था आरोग्य विभागाकडे आहे. अशावेळी तीन कोटीचे एक वाहान ज्यात सुमारे ६९ लाख रुपयांची अत्याधुनिक उपकरणे बसविली जाणार आहेत त्यांचा नेमका उपयोग कोणाला होणार आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
या तीन कोटी रुपयांच्या एका आलिशान वाहानाची किंमत एक कोटी ९० लाख इतकी असून या वाहानात ६९ लाख रुपयांची अत्याधुनिक उपकरणे बसविण्यात येणार आहेत. यात पेसमेकर व मॉनिटरसह डिफेब्रिलेटर ज्यांची किंमत साडेपाच लाख रुपये, स्वयंचलित आयव्हीडी मशीन ज्याची किंमत १६ लाख रुपये, ११ लाख रुपयांचे एक्स-रे मशिन, १२ लाखाचे पोर्टेबल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग मशिन, १५ लाखांचे अल्ट्रासाऊंड मशिन, तीन लाखांचे ऑटो रिफ्रेक्टोमीटर, साडेतीन लाखांची पोर्टेबल मोबाईल लॅब, १० लाखांचा मल्टी पॅरामीटर मॉनिटर ईसीजीसह आदी ६९ लाख रुपयांहून अधिक किमतीची उपकरणे या फिरत्या दवाखान्यात असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या व आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सादर केलेल्या या प्रस्तावात एवढे उच्च तंत्र व उपकरणे असलेल्या या एका फिरत्या दवाखान्यासाठी तीन डॉक्टर जे या उपकरणांच्या चाचण्यांचे अहवाल अभ्यासून उपचार करू शकतात तसेच तंत्रज्ञ , परिचारिका ,वाहान चालक, पेट्रोल व देखभाल यासाठी दरमहा किमान १५ ते २० लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे. कूण ७६ वाहने खरेदीचा प्रस्ताव असून यासाठी डॉक्टर आदींचा वार्षिक खर्च किमान १३८ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. एवढी महागडे वाहनरुपी फिरता दवाखाना किमान १० वर्षे चालवायचा झाल्यास वाहनांची देखभाल व डॉक्टर आदींच्या पगारासाठी २००० कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च कोण करणार हा कळीचा मुद्दा आहे.
हेही वाचा…मूक आंदोलनातून सरकारची कोंडी? बंदला मज्जाव केल्यानंतर मविआचा नवा पवित्रा
वित्त विभागाकडे सादर करण्यात आलेल्या या वाहान खरेदी प्रस्तावात सदर ७६ वाहाने ही मुख्यमंत्री आपत्कालीन निधीत करोना काळातील शिल्लक असलेल्या ४०० कोटींच्या निधीतून खरेदी करण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. वाहान खरेदी व कंट्रोल रुम आणि प्रशासकीय यासाठी सुमारे २५० कोटींचा खर्च आहे. त्यानुसार या गाड्या खरेदी जरी करण्यात आल्या तरी नंतर येणारा डॉक्टर,तंत्रज्ञ, कर्मचारी व देखभालीचा वार्षिक १३८ ते १५० कोटींचा खर्च कोण करणार हा कळीचा मुद्दा आहे. आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आधिच आरोग्य विभागात डॉक्टरांची ३० टक्के पदे रिक्त आहेत तर विशेषज्ञ डॉक्टरांची ६१ टक्के पदे रिक्त असताना या आलिशान फिरत्या दवाखान्यांसाठी डॉक्टर आणायचे कोठून हाही एक मुद्दा आहे. मुळातच हा प्रस्ताव अत्यंत अव्यवहार्य असल्याचे वित्त व आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये एमडी फिजिशीयन, भूलतज्ज्ञ तसेच अस्थिशल्यचिकित्सकांची पदे भरली तर गोरगरीब रुग्णांवर वेळेत प्रभावी उपचार करता येतील.
© The Indian Express (P) Ltd