मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून महत्त्वाच्या व जिल्हास्तरीय पदांवर गुणवत्ताधारित पदस्थापना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. अधिकाऱ्यांच्या मागील तीन वर्षांतील उपलब्ध व प्रमाणित कामगिरीचे १०० गुणांच्या निकषांवर मूल्यमापन केले जाणार असून,आरोग्य प्रशासनात आता कामगिरीच्या आधारावर नियुक्ती केली जाणार आहे.
राज्यातील नागरिकांना दर्जेदार व गतिमान आरोग्य सेवा देणे, मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे आणि नीती आयोगाने निश्चित केलेले शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी कामगिरीवर आधारित पारदर्शक पदस्थापना प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाने मंगळवारी शासन निर्णय जारी केला. जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त व सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह शासन निर्णयात नमूद केलेल्या संबंधित पदांना लागू राहील. शासन आवश्यकतेनुसार अन्य तत्सम जिल्हास्तरीय प्रमुख आरोग्य पदांचाही या कार्यपद्धतीत समावेश करू शकेल.
मूल्यमापनामध्ये जनाभिमुखता व तक्रार निवारण, नेतृत्वगूण, आर्थिक व्यवस्थापन, आहार-पोषण, औषधे व स्वच्छता, मनुष्यबळ व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व साथरोगातील कार्य, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय कामगिरी, शासकीय मोहिमांची अंमलबजावणी, डिजिटल सेवा, आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची एकत्रित अंमलबजावणी तसेच जिल्हा आरोग्य सेवा बळकटीकरणाचे भविष्यातील नियोजन या ११ घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
विभाग मूल्यमापनासाठी आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली, अधिकृत पोर्टल, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे अहवाल, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके, कायाकल्प व भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांचे अहवाल, आर्थिक व लेखापरीक्षण नोंदी, तपासणी अहवाल, औषधे व उपकरणांची उपलब्धता, मनुष्यबळ नोंदी, रुग्ण अभिप्राय आणि तक्रार निवारण नोंदींचा वापर करेल. प्रत्येक निर्देशांकासाठी अधिकृत व पडताळणीयोग्य पुरावा आवश्यक राहील आणि एकाच कामगिरीसाठी दुहेरी गुण दिले जाणार नाहीत.
एकूण गुणांनुसार ७१ ते १०० गुण मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘अ-उत्कृष्ट’, ५० ते ७० गुण मिळविणाऱ्यांना ‘ब-अतिशय चांगली’, ३० ते ४९.९९ गुण मिळविणाऱ्यांना ‘क-समाधानकारक’ आणि ३० पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्यांना ‘ड-सुधारणा आवश्यक’ अशी श्रेणी दिली जाईल. ‘अ’ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा गुणवत्ताधारित पदस्थापनेसाठी प्राधान्याने, तर ‘ब’ श्रेणीतील अधिकाऱ्यांचा त्यानंतर विचार केला जाईल.
सेवाज्येष्ठता, अनुभवालाही महत्त्व
मूल्यमापन श्रेणी हा पदस्थापनेचा एकमेव निकष राहणार नाही. अंतिम पदस्थापना करताना पात्रता, सेवाज्येष्ठता, अनुभव, उपलब्ध पदे, आरक्षणाच्या तरतुदी, प्रशासकीय आवश्यकता, संवर्ग नियम, बदलीविषयक कायदे व नियम आणि अन्य वैधानिक निर्देशांचा एकत्रित विचार केला जाईल. समान किंवा जवळपास समान पात्रता व सेवास्थिती असलेल्या अधिकाऱ्यांमधून निवड करताना मूल्यांकनाला महत्त्व दिले जाणार आहे.
आरोग्य अभियान संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती
आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय मूल्यमापन समिती काम करेल. समितीत शहरी आरोग्य आयुक्त, संबंधित संचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी, राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राचे कार्यकारी संचालक आणि गुणवत्ता आश्वासन किंवा आरोग्य व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असेल. पारदर्शकता आणि एकसमानता राखण्यासाठी विभाग आवश्यकतेनुसार ऑनलाइन कार्यक्षमता मूल्यमापन प्रणाली विकसित करेल. प्रत्येक घटकाचा पुरावा, गुणांकन, मूल्यमापन करणारा अधिकारी आणि अंतिम अनुमोदन यांची डिजिटल नोंद ठेवली जाणार आहे.
३१ मार्च अखेर मूल्यमापन
‘क’ किंवा ‘ड’ श्रेणीतील अधिकाऱ्यांसाठी आवश्यकतेनुसार कार्यक्षमता सुधारणा आराखडा तयार केला जाईल. त्यामध्ये कमतरतेची क्षेत्रे, सुधारणा उपाय, मार्गदर्शन, प्रशिक्षण, कालमर्यादा आणि पुनर्मूल्यमापनाचा समावेश असेल. अशा अधिकाऱ्यांचे साधारणतः सहा ते बारा महिन्यांत पुनर्मूल्यमापन करता येईल. कामगिरी कमी असल्यास मुदतपूर्व बदली करण्याचे अधिकार शासनाकडे राहतील. सर्व कार्यरत अधिकाऱ्यांच्या मागील तीन वर्षांच्या कामकाजाचे मूल्यमापन दरवर्षी ३१ मार्चअखेर केले जाईल.
