मुंबई : आरोग्य विभागात नवीन पदभरती करताना व सेवांतर्गत पदव्युतर पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराना नियुक्ती देताना प्रथम आदिवासी विभागातील पदे भरण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे. आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्यात आल्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदे भरण्यात येणार आहेत. तसेच बिगर आदिवासी भागात सेवा देत असलेल्या अधिकाऱ्यांनाही यापुढे आदिवासी व दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणाला हातभार लागण्यास मदत होणार आहे.
गेल्या वर्षभरात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व आदिवासी व दुर्गम जिल्ह्यातील आरोग्यसंस्थांना भेटी देऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये आदिवासी भागामध्ये सोयी-सुविधांच्या अभावामुळे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. परिणामी अनेक पदे रिक्त रहात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आदिवासी भागामधील आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आणि वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी पदभरतीसाठी ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आदिवासी दुर्गम भागातील विशेषतज्ज्ञासह सर्व संवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे प्राधान्याने भरली जाऊन वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
‘ट्रायबल फर्स्ट’ धोरणानुसार पदभरतीमध्ये आदिवासी विभागाला प्राधान्य दिले असले तरी बिगर आदिवासी भागात सेवा देत असलेल्या अधिकाऱ्यांनाही यापुढे आदिवासी व दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक असणार आहे. आदिवासी भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षानंतर बदलीसाठी विनंती करता येईल, मात्र त्यांच्या जागी दुसरे वैद्यकीय अधिकारी हजर झाल्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आदिवासी, दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता भासणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी भागातील रुग्ण सेवा अधिक बळकट करण्यासाठी प्रकाश आबिटकर यांनी प्रशासनाला हे धोरण तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्यासंदर्भात गांभीर्याने पावले उचलत असून, माता मृत्यू, बालमृत्यू, सिकलसेल, ॲनिमिया आणि इत्यादी समस्येवर मात करून आदिवासींना वेळेवर व चांगली रुग्णसेवा मिळेल “, असा विश्वास प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
