scorecardresearch

सक्ती नाही; पण मुखपट्टी वापरा! ; राजेश टोपे यांचा सल्ला

महाराष्ट्रासह काही राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

मुंबई : राज्यात करोना रुग्णसंख्येत काहीशी वाढ होत असली तरी काळजीचे कारण नाही. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आह़े  मात्र, राज्यात मुखपट्टी वापराची सक्ती पुन्हा करण्याची गरज नसली तरी गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले.

 देशात रुग्णसंख्येत वाढ होत असून, दिल्लीत मुखपट्टी सक्ती पुन्हा लागू करण्यात आली आहे. राज्यातही करोना रुग्णांचा आकडा हळूहळू वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर टोपे यांनी नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्रासह काही राज्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील करोना परिस्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. आरोग्य विभागाच्या नियमित सादरीकरणाच्या वेळी राज्यात खबरदारी घेण्याचा मुद्दा उपस्थित झाला. राज्यात मुखपट्टी सक्तीपोटी आकारला जाणारा दंड रद्द केला असला तरी मुखपट्टी वापरु नये, अशा सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे मुखपट्टीचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केले.

दिल्लीत मोठी रग्णवाढ

दिल्लीत करोना रुग्णसंख्येतील वाढ कायम असून, बुधवारी १००९ रुग्णांची नोंद झाली़  तेथे संसर्गदर ५़ ७० टक्के आह़े  दिल्लीतील उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६४१ वर पोहोचली आह़े  दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत २०६७ नवे रुग्ण आढळल़े

राज्यात १६२ नवे रुग्ण

राज्यातील करोना रुग्णसंख्येत काही अंशी वाढ होत असून, बुधवारी १६२ रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील ९८ रुग्णांचा समावेश आह़े  गेल्या २४ तासांत राज्यात शून्य मृत्यूनोंद झाली. सध्या राज्यात ६९० रुग्ण उपचाराधीन आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra health minister rajesh tope appeal to use mask zws

ताज्या बातम्या