करोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद झालेली उपनगरी रेल्वेची दारे जवळपास दहा महिन्यांनी सोमवारी खुली झाली आहेत. मात्र सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी वेळेचं बंधन असून त्याचं उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जात आहे. सर्वसामान्यांना सकाळच्या वेळी पहिल्या लोकलपासून ते पहाटे सात वाजेपर्यंतच प्रवास करण्याची मुभा असल्याने नोकरदार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सातच्या आत स्थानकात!

“लोकांची सोय हीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवलं जाईल. लोकांचं हित हेच अंतिम महत्वाचं असतं. त्यामुळे त्याचदृष्टीने काम केलं जाईल. यामुळे काही बदल अपेक्षित असेल तर ते करण्यासाठीचे प्रयत्न असतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

उघडले रेल्वेचे दार!

पुढे ते म्हणाले की, “लोकलच्या वेळा नक्कीच बदलू शकतात. लोकांचं हित आणि गरज त्यांच्या संदर्भाने सोयीचं असणं महत्वाचा विषय आहे. सुधारणा होण्याची गरज असेल तर आमचा विभागदेखील कळवेल आणि राज्य सरकारही त्यासंदर्भात निर्णय घेईल”.

सर्वसामान्यांसाठी काय आहेत लोकलच्या वेळा?
पहाटे पहिल्या उपनगरी रेल्वेगाडीपासून ते सकाळी ७ पर्यंत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ पर्यंत, तसेच रात्री ९ नंतर सर्वाना रेल्वेप्रवासाची मुभा आहे. दरम्यानच्या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच स्थानकात प्रवेश आहे. त्यामुळे प्रवाशांवर तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पाहा फोटो >> लोकल प्रवासासाठी प्रवाशांच्या स्टेनशबाहेर रांगा; ट्रेन पकडण्यासाठी धावाधाव

प्रवासी संख्येत वाढ किती?
* २९ जानेवारीला पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरून साडेनऊ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. तर सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत ११ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. रात्री उशिरापर्यंत प्रवासी संख्येत ४ लाखांहून अधिक भर पडण्याची शक्यता पश्चिम रेल्वेने व्यक्त केली.
* मध्य रेल्वेवरून २९ जानेवारीला १३ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. १ फे ब्रुवारीला सायंकाळी ६ पर्यंत १४ लाख ५० हजार प्रवाशांनी प्रवास के ला आणि रात्री उशिरापर्यंत ५ लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडण्याची शक्यता आहे.