scorecardresearch

“ताई दिलगिरी व्यक्त करतो..” हिरकणी कक्ष दुरवस्थेबाबतच्या सरोज अहिरेंच्या तक्रारीची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतली दखल

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे तसंच असा प्रकार पुन्हा घडणार नाही असंही आश्वासन दिलं आहे

Maharashtra Health Minister Tanaji Sawant took cognizance of Saroj Ahire complaint regarding the poor condition of the Hirakni room
काय म्हटलं आहे तानाजी सावंत यांनी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या आपल्या बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. पण, बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच तक्रारही केली. या तक्रारीची दखल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घेतली आहे.

नेमकी काय घडली घटना?

देवळाली विधानसभेच्या विद्यमान आमदार सरोजताई अहिरे ह्या आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर झाल्या. हिवाळी अधिवेशना दरम्यान आरोग्य विभागातर्फे नागपूर येथे हिरकणी कक्ष सुरू केला होता. या कक्षात बाळाची देखभाल करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि आया याची सुविधा आपण उपलब्ध केली होती. दरम्यान सरोज ताई यांनी या संदर्भातील निवेदन प्रधान सचिव यांच्याकडे दिले होते. आज त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आल्या असता त्यांना उपलब्ध करून दिलेला हिरकणी कक्ष हा सुविधांपासून वंचित होता. याची तक्रार करत सरोज ताई यांनी माध्यमांमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी केली. एक लोकप्रतिनिधी म्हणून सरोज ताई अधिवेशनात सहभागी झाल्या आहेत दरम्यान एक आई म्हणून होणाऱ्या असुविधेबद्दल त्यांनी तक्रार करणे हे क्रमप्राप्त आहे.

सरोज आहिरे यांनी काय मागणी केली?

“आईचं पहिलं कर्तव्य फक्त बाळासाठी राहिलं पाहिजे. परंतु, नाण्याच्या दोन बाजू आहेत, एक आई तर दुसरी आमदार म्हणून. दुसरी बाजू बजावण्यासाठी आले होते. मात्र, आज मला जावं लागत आहे. या धुळीत माझ्या बाळाला ठेऊ शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत महिलांसाठी व्यवस्था करावी,” अशी मागणी सरोज अहिरे यांनी केली आहे

आरोग्य मंत्र्यांकडून तातडीने दखल

सरोजताईंची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांच्या कानावर जाताच त्यांनी सरोजताईंशी दूरध्वनीहून संपर्क साधला व त्यांना येत्या २४ तासांच्या आत आया, नर्स, डॉक्टर सह सुसज्ज असा हिरकणी कक्ष तयार असेल याची ग्वाही दिली. यातून प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या कर्तव्य तत्परतेबद्दल आज पुन्हा एकदा प्रत्यय आला. आपल्या मतदारसंघाप्रती असणाऱ्या आपल्या बांधिलकीचे कर्तव्य बजावण्यासाठी अधिवेशनात आलेल्या आमदार सरोजताई अहिरे यांच्या बद्दल आदर व्यक्त करून मंत्री सावंत यांनी दाखवलेली संवेदनशीलता आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आमदार सरोजताई व चिमुकल्या बाळाला कुठल्याही असुविधेला तोंड द्यावे लागणार नाही या संदर्भातील सूचना मंत्री सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 22:06 IST
ताज्या बातम्या