मुंबई : आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी सवर्गातील सर्व अधिकाऱ्यांचे आता गुणांकन केले जाणार आहे. याविषयीचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले असून या डॉक्टरांच्या तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. यामुळे केवल सेवाज्येष्ठता नव्हे तर प्रत्यक्ष कामगिरीला प्राधान्य देऊन त्यानुसार भविष्यात नियुक्ती केली जाणार आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये ज्यांची ३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण होत आहे त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब ,क ,ड अश्या चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. म्हणजेच, तीन वर्षांची कामगिरी आता अधिकाऱ्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. व दरवर्षी असे गुणांकन केले जाणार आहे.
अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लोकाभिमुखता आणि तक्रार निवारणापासून सुरुवात करून नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण व संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि सामाजित दायित्व निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे. आरोग्य संस्थांमध्ये आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल.
अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळाचे व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान, कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे. या प्रक्रियेची जबाबदरी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
