मुंबई : राज्यात काही भागातील उकाड्यात लक्षणीय वाढ झालेली असतानाच आता विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कमाल तापमानात वाढ होणार असून उन्हाचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तर कोकणपट्ट्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

हवामान बदलाच्या परिणामांची तीव्रता जगभरासह देशात आणि महाराष्ट्रातही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांना अस्थिर हवामानाचा सामना करावा लागत आहे. राज्यात मुख्यतः मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काही भागात वादळी वारे, गारपीट आणि पावसाची नोंद झाली. पश्चिमी विक्षोभाच्या स्थितीमुळे राज्यात पावसाळी हवामान होते. यामुळे यादरम्यान कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट नोंदली गेल्याने राज्यवासीयांना तीव्र उन्हापासून काही काळ दिलासा मिळाला होता. मात्र, मागच्या तीन – चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागातील कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाली असून काही भागात सरासरी तापमानाहून अधिक कमाल तापमानाची नोंद होत आहे.

देशात सर्वात उष्णाता अकोल्यात

सोमवारी विदर्भातील कमाल तापमानात वाढ होऊन चार जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला. यात देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे झाली. येथील कमाल तापमान ४३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तर अमरावती आणि यवतमाळ येथे ४३.२, तर वर्धा येथे ४३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात बुधवारी उष्णतेची लाट कुठे ?

राज्यातील काही भागात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागने सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आदी भागांना बुधवारी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. यामुळे पुढील काही दिवस या भागात उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यात बुधवारी उष्ण आणि दमट वातावरण कुठे ?

मागील काही दिवसांपासून मुख्यत: कोकण पट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद होत आहे. ठाणे आणि रायगडमध्ये मंगळवारी, तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी कोकण प्रांतातील सर्वच जिल्ह्यांना बुधवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे.