मुंबई : राज्यामध्ये वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही हाेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक आहे. वाढत्या तापमानामुळे आतापर्यंत ३९ जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. तर एका व्यक्तीची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद झाली मार्चमध्ये फक्त सात जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता, तर एप्रिलमध्ये आतापर्यंत ३२ रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णांची नोंद

राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे. मार्च सुरू झाल्यापासून राज्यामध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. एप्रिलमध्ये तापमानामध्ये अधिकच वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे मागील दोन महिन्यांमध्ये राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये तब्बल ३९ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोल्यामध्ये सर्वाधिक ११ रुग्णांची नोंद झाली आहे, त्याखालोखाल नंदुरबार ६, रत्नागिरी ५, गडचिरोली, जालना, पालघर, रायगड आणि साताऱ्या या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आणि गोंदिया, जळगाव, नाशिक, परभणी, पुणे, सोलापूर आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच सोलापूरमध्ये एका रुग्णाचा उष्माघाताने संशयित मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

अद्यापपर्यंत मुंबईमध्ये रुग्णाची नोंद नाही

उष्माघाताचा त्रास झालेले सात रुग्ण मार्चमध्ये सापडले होते. मात्र एप्रिलमध्ये या रुग्णांच्या संख्येत जवळपास पाच पटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मार्चमध्ये फक्त सहा जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले होते. तर एप्रिलमध्ये जिल्ह्यांची संख्या १५ इतकी झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडत असताना मुंबईमध्ये आतापर्यंत उष्माघाताच्या रुग्णाची नोंद झाालेली नाही.

पार अधिक वाढण्याची शक्यता

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये एप्रिलमध्ये गारपीठ झाल्याने उष्णतेचा पारा अधिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन

उष्णतेच्या लाटेच्या काळात काळजी घेणेच सर्वात उत्तम उपाय आहे. स्वच्छ पाणी प्या, हलका आहार घ्या, सावलीच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा आणि गरज असल्यास वैद्यकीय मदत घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, वाढत्या तापमानामुळे सुरुवातीच्या निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ येणे असा त्रास होतो. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास डोके झाकून घ्यावे, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिला.

उष्णतेशी संबंधित आजार आणि लक्षणे

उष्णतेचा त्रास – तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, उलट्या, त्वचा कोरडी पडून घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था

निर्जलीकरण – शरीरात पाण्याची कमतरता, तोंड काेरडे पडणे, अशक्तपणा, लघवी कमी हाेणे

उष्णतेचा थकवा – खुप घाम येणे, रक्तदाब कमी हाेणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे

उष्माघात – स्नायूंमध्ये वेदना, विशेषत: पाय आणि हात दुखणे