मुंबई : मार्च सुरू झाल्यापासून राज्यामध्ये सातत्याने तापमान वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील सात जणांना वाढत्या तापमानामुळे मार्च महिन्यात उष्माघाताचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले. मात्र मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. राज्यात २०२५ मध्ये याच कालावधीत उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ३०, तर २०२४ मध्ये ४० होती.

राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत. राज्यात मार्चमध्ये उष्माघाताने बाधित झालेल्या सात रुग्णांची नोंद झाली आहे.

यात पालघरमध्ये दोन रुग्ण, तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मात्र मुंबईत अद्याप उष्माघाताचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान, राज्यात मार्च २०२५ मध्ये ३० जणांना, तर मार्च २०२४ मध्ये ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.

एप्रिलमध्ये राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने पुढील काळात उष्णतेचा पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील नागरिकांना अधिक त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट आल्यास काळजी घेणेच सर्वात उत्तम उपाय आहे. स्वच्छ पाणी प्या, हलका आहार घ्या, सावलीच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा आणि गरज भासल्यास वैद्यकीय मदत घ्या.

स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, वाढत्या तापमानामुळे सुरुवातीला निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ येणे असा त्रास होतो. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास डोके झाकून घ्यावे, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिला.

उष्णतेशी संबंधित आजार आणि लक्षणे

उष्णता लागणे – तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, उलट्या, त्वचा कोरडी पडून घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था.

निर्जलीकरण – शरीरात पाण्याची कमतरता, तोंड काेरडे पडणे, कमजोरी, लघवी कमी हाेणे.

उष्णतेचा थकवा – खूप घाम येणे, रक्तदाब कमी हाेणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे.

उष्माघात – स्नायूंमध्ये वेदना, विशेषत: पाय आणि हातामध्ये.