मुंबई : राज्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये शेतीपिकांच्या नुकसानीपोटी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख नऊ हजार रुपयांचा समावेश आहे. या मदतीचा फायदा राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना होणार आहे.

राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ३ लाख नऊ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांच्या सुमारे २ लाख ६८ हजार ९१८ हेक्टर क्षेत्रासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील २७ जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांबरोबरच शेतजमिनीचेही मोठे नुकसान झाले. राज्यातील ३४ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ७ हजार ६७५.४० हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीपोटी २९ कोटी २१ लाख नऊ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांचा त्यात समावेश आहे.

शेतजमिनीच्या नुकसानीसाठी जमीनमालक असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दरानुसार जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. जमिनीतील वाळू, गाळ किंवा क्षार काढणे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पात्र नुकसानीसाठी या निधीचा विनियोग केला जाणार आहे. शेतीपिकांच्या नुकसानीची मदत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी मदत बँकांनी कर्जखात्यात किंवा अन्य कोणत्याही वसुलीसाठी वळती करू नये, अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना द्याव्यात असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना या निधीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. प्रत्यक्ष मदत खात्यात जमा होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची पडताळणी आणि वितरणाची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने एक हजार ३०६ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी ५८ लाख रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मार्च मध्ये हा अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे ९२८ हेक्टरवरील शेतपिक बाधित झाली होती.