मुंबई : मागच्या १० दिवसांमध्ये मुंबई व राज्याच्या काही भागात अतिवृष्टीच्या काळात ६३ नागरिकांचे अपघाती मृत्यू नोंदले असून त्यामध्ये २३ वीज पडून तर २५ बळी भीत कोसळून गेले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना महाजन म्हणाले, मुंबईत दर पावसाळ्यात सुमारे ८०० वृक्ष उन्मळून पडतात. मात्र यावेळी दोन दिवसात ४०० वृक्ष कोसळले आहेत. त्याची विविध कारणे पुढे येत आहेत. त्यामुळे मुंबईत कोणते वृक्ष लावायचे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. प्रत्येक जिल्ह्याला आपत्ती काळात मदतीसाठी प्रत्येकी एक कोटी रुपये दिले आहेत. हवामान अंदाजाविषयी आपण १६ कोटी २१ लाख नागरिकांना भ्रमणध्वनी संदेश पाठवले होते.

अतिवृष्टीच्या अपघातामध्ये २०० प्राण्यांचा मृत्यू झाला असून ७८ नागरिक जखमी आहेत. ६ वृक्ष कोसळून, ३ पुराच्या पाण्यात आणि ६ दरड कोसळून नागरिकांचा मृत्यु झाला आहे. मयतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत दिली आहे. राज्य संकटात आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण न करता सहकार्य करावे, अशी विनंती मंत्री महाजन यांनी केली.

आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन सभागृहात उपस्थित नसल्यामुळे या चर्चेला वित्त राज्यमंत्री आशिष जायस्वाल उत्तर देत होते. मंत्री जायस्वाल यांनी आपल्या उत्तरांमध्ये शिवसेनेच्या काळात मुंबई महापालिकेतील विषय काढला. त्याला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. यावरून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि मंत्री जायस्वाल यांच्यात बाचाबाची झाली.

मंत्र्यांच्या उत्तरांमध्ये काही विशेष नाही, त्यामुळे त्यांनी आपले उत्तर टेबल करावे, असा मुद्दा आव्हाड यांनी मांडला. त्याला उत्तर देताना मंत्री जायस्वाल पण यांनी मी तुमच्यापेक्षा या सभागृहात वरिष्ठ आहे लक्षात ठेवा, असे आव्हाड यांना सुनावले. अखेर या वादामध्ये काँग्रेसचे नाना पटोले यांनी मध्यस्थी केली आणि वातावरण शांत केले.

त्यानंतर मंत्री महाजन यांनी या चर्चेला उत्तर दिले. पाऊस एका दिवसात 600 मिलिमीटर पर्यंत पडला आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. विरोधकांनी सरकारला सहकार्य करावे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले. आपत्तीच्या सर्व ठिकाणांना मंत्री या नात्याने आपण भेट देत आहोत. आपत्तीग्रस्तांना युद्ध पातळीवर मदत केली जात आहे, असेही महाजन यांनी सभागृहात स्पष्ट केले.