मुंबई : गेली दोन दिवस पडणारा मुसळधार पाऊस बघून ग्रामीण भागातील जनता आवाक झाली आहे. गावाच्या आजूबाजूचे डोंगर, टेकडीचे भूस्खलन, सोसाटयाचा वारा, मुसळासारख्या जाड सरी, वीजांचा कडकडाट, बघून अनेक पावसाळे पाहणारे ग्रामस्थ ‘असा अवचित पाऊस म्या उभ्या आयुष्यात बघितला नाही’ अशी प्रतिक्रिया ग्रामीण ढंगात देत आहेत.
राज्यात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. या अतिवृष्टीने दहा जणांचा जीव गेला आहे. मागील चोवीस तासात रायगड जिल्हयात २३६, ठाण्यात १६१ रत्नागिरीत १५२, पालघर १३२, मुंबईत १६१ मिलिमीटर पाऊस पडलल्याची नोंद आहे. लोणावळा खंडाळ्यात तर चक्क ६२५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. रायगड जिल्हयापेक्षा हा पाऊस तीनपट जास्त आहे. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात भूस्खलन झाले आहे. ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर कोसळत आहेत. याआधी राज्याने अनेक मोठे पावसाळे अनुभवले आहेत.
जुलै २०२१ मध्ये कोकणातील महाड, चिपळूण, रायगड आणि सातारा जिल्ह्यांत अतिवृष्टी होऊन महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती. जुलै २०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली येथे ऐतिहासिक पूर आला होता. २००५ मध्ये मुंबईत २४ तासांत ९४४ मिमी पाऊस पडल्याने राष्ट्रीय विक्रम झाला होता. त्यामुळे २००५ चा जुलै महिना कोणाही विसरत नाही. सोमवारी पडणाऱ्या पावसाने २६ जुलैची पुर्नरावृत्ती होते की काय, अशी भिती निर्माण झाली होती. दोन दिवस पडणाऱ्या यंदाच्या पावसात अनेक ठिकाणी कमी कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर खचणे, मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणे आणि नद्यांचे रौद्ररूप अधिक गंभीर ठरले आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली आहे.
मावळ तालुक्यात पडलेला अतिमुसळधार पाऊस बघून”असा पाऊस म्या आयुष्यात कधीच बघितला नाही.. यापूर्वी मुसळधार पाऊस पाहिलेला आहे. सलग दोन दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस कधीच पाहिला नाही. त्यामुळे डोळयासमोरील डोंगर कोसळताना पाहावे लागले आहेत.” अशी प्रतिक्रिया मावळ तालुक्यातील दुधिवरे गावातील ग्रामस्थांची आहे. सध्या महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात कमी अधिक प्रमाणात ही प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या पश्चिम, मध्य आणि कोकण पट्ट्यात कोसळणाऱ्या विक्राळ पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी डोंगर-दऱ्या खचल्या, दरडी कोसळल्या, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने गावोगावी पुराचे पाणी शिरले आहे.
सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुणे जिल्ह्यातील मावळ, लोणावळा, ताम्हिणी घाट परिसर, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागात निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण डोंगरांचे उतार खचल्याने रस्ते बंद झाले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. काही ठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरात अल्पावधीतच विक्रमी स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार कमी वेळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली पर्जन्यवृष्टी ही अत्यंत दुर्मिळ मानली जाते. त्यामुळे ओढे-नाले काही मिनिटांत दुथडी भरून वाहू लागले. त्यामुळे आजूबाजूच्या अनेक गावांचा संपर्क तुटला.
हवामानातील बदल, वातावरणात वाढलेली आर्द्रता आणि हवामान बदलाचा वाढता परिणाम यामुळे अशा अतिवृष्टीच्या घटना वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पूर्वी संपूर्ण महिनाभर पडणारा पाऊस आता काही तासांत किंवा दोन-तीन दिवसांत कोसळत असल्याने पूर, दरडी आणि भूस्खलनाचा धोका अनेक पटींनी वाढला आहे. ही स्थिती यापुढेही निर्माण होऊ शकते असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
“असा पाऊस मी आयुष्यात कधीच पाहिला नाही, बाबा!”
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून लोणावळ्यात ६२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून १० जणांचा मृत्यू झाला आहे.
Written by विकास महाडिक

First published on: 07-07-2026 at 02:11 IST | © The Indian Express (P) Ltd
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra heavy rain lonavala maval flood landslide updates rub