मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही (एसटी) बसला. सोमवारी वादळवाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे एसटी महामंडळाचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या दोन दिवसांत राज्यभरातील तब्बल ७,८२० एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे २.३० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले.

राज्यभरात अनेक ठिकाणी दरड कोसळणे, रस्त्यावर झाडे पडणे व रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने शेकडो एसटी फेऱ्या रद्द केल्या. सततच्या पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग; तसेच जुना मुंबई – पुणे महामार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे दोन्ही महामार्गांवरील वाहतूक प्रभावित झाली. पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी मुंबई – पुणे किंवा पुणे – मुंबई प्रवास करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुसळधार पावसामुळे रविवारी राज्यभरातील दैनंदिन ८४ हजार फेऱ्यांपैकी ३,६०१ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे १.७४ लाख किमीचा प्रवास रद्द झाला आणि एसटी महामंडळाचे ६९.९७ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले. तर, सोमवारी सायंकाळी ६ पर्यंत परिस्थिती अधिकच बिकट झाली. या दिवशी एसटीच्या ४,२१९ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ३.०७ लाख किमीचा प्रवास रद्द झाला असून १.६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. अशा प्रकारे केवळ दोन दिवसांत एसटीच्या एकूण ७,८२० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे सुमारे ४.८१ लाख किमीचा प्रवास रद्द होऊन महामंडळाचे २.२९ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न बुडाले.

एसटी प्रशासनाचे आवाहन

दरड कोसळणे, रस्त्यावर पाणी साचणे व वृक्ष पडझडीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र व घाट परिसरातील ग्रामीण व शहरी मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी स्थानकांत अडकून पडले. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी नजीकच्या एसटी आगाराशी संपर्क साधून फेऱ्यांची माहिती घ्यावी, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

पावसामुळे रद्द झालेल्या फेऱ्या

रविवारी

दैनंदिन फेऱ्या – ८४ हजार रद्द फेऱ्या – ३,६०१

रद्द किमी – १.७४ लाख किमी

बुडालेले उत्पन्न – ६९.९७ लाख रुपये

सोमवारी सायं. ६ पर्यंत

दैनंदिन फेऱ्या – ८४ हजार रद्द फेऱ्या – ४,२१९

रद्द किमी – ३.०७ लाख किमी

बुडालेले उत्पन्न – १.६० कोटी रुपये

दोन दिवसांची एकूण स्थिती

एकूण रद्द फेऱ्या – ७,८२०

एकूण रद्द किमी – ४.८१ लाख किमी

एकूण बुडालेले उत्पन्न : २.२९ कोटी रुपये